न्यामतुल्ला शाहवली बाबांच्या उरूसानिमित्त संदल मिरवणूक ; दिवसभर दर्शनासाठी लोटला हजारो भाविकांचा जनसागर
बोदवड- हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या उजनी येथील हजरत ख्वॉजा न्यामतुल्ला शाह वली बाबांच्या उरूसानिमित्त शनिवारी दर्ग्यावर चादर चढवण्यात आली. याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी दर्ग्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दोन दिवस उरूसाचा रविवारी स मारोप होणार आहे. उरूसानिमित्त रात्री कव्वालीचा मुकाबला होणार आहे.
संदल मिरवणुकीत एकात्मेचे दर्शन
उरूसानिमत्त बोदवड शहरातील भाविक आसीफ शाह गुलाब शाह यांच्या निवासस्थानापासून संदल मिरवणुकीतीला वाजत गाजत प्रारंभ झाला. राज्यभरातील काही फकीर बाबांनी यात हजेरी लावली तसेच विविध शस्त्रांच्या सहाय्याने साहसी खेळ सादर करून लक्ष वेधण्यात आले. आखाडा मोहल्ला भागातून निघालेली मिरवणूक काढून प्रभात फेरीमार्गे वाजत-गाजत उजनी दर्ग्यावर पोहोचल्यानंतर फुलांची चादर चढवण्यात आली. याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या हिंदू-मुस्लीम भाविकांना साखर, फुटाणे, खारीक, पोळी, गुळ आणि दही याला मिसळून केलेला प्रसाद वाटप करण्यात आला.
गोड पाण्याचा जिवंत झरा
बाबांच्या दर्ग्याच्या खाली एक जिवंत पाण्याचा झरा आहे या झर्यातून स्वच्छ पाणी पुरातन काळापासून वाहते. तालुक्यात दुष्काळजन्य परीस्थिती असतानाही निखळ खदखद वाहता झरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते शिवाय उजनी दर्ग्यावर वर्षाच्या 12 महिन्यात दर गुरुवारी भाविक मानलेला नवस पूर्ण झाल्यानंतर येत असल्याने दर्ग्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. दर्ग्यावर भाविक बोकडाचा, वरण बट्टीचा नवस मनोकामना पूर्ण झाल्यानंतर फेडतात
आज उरूसाचा समारोप
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या दर्ग्यावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उरूसाचा रविवार, 24 मार्च रोजी समारोप होत आहे. रविवारी कव्वालीचा सामनादेखील यानिमित्त ठेवण्यात आला आहे. उरूसानिमित्त विविध व्यावसायीकांनी दुकाने थाटल्याने मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली तर मलकापूर, नांदुरा, सुरत, भुसावळ, मुक्ताईनगर, बर्हाणपूर, रावेर, यावल, पाचोरा, जामनेर, बुलढाणा, मालेगाव, चाळीसगाव आदी भागातून आलेल्या भाविकांनी दिवसभर दर्ग्यावर दर्शनासाठी गर्दी केली होती.