उजनी जलाशयातील पाणी वळविण्याच्या हालचालींना वेग

0

शेतकरी हवालदिल : पाण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा

इंदापूर : उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी राखीव असलेल्या पाण्यातील 1.97 टीएमसी व प्रस्तावित लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचे 0.33 टीएमसी असे 2.33 टीएमसी पाणी कमी करून मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सोलापूर जिल्हामध्ये इतर ठिकाणी वळविण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पाणी वळविण्याचा प्रस्ताव मंजूर

उजनी धरणाचा पाणीसाठा 117.23 टीएमसी इतका असून, यातील उपयुक्त पाणी 53.66 टीएमसी व मृत पाणी साठा 63.66 टीएमसी आहे. सध्या धरणातील 9.6 टीएमसी पाणी खासगी उपसा क्षेत्रासाठी राखीव असून, शेतकरी उजनीमधून विद्युत पंपाने उपसा करून सुमारे 34 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती करीत आहेत. तसेच प्रस्ताविक लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी 0.90 टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, यातील 0.33 टीएमसी पाणी कमी करून तसेच शेतकर्‍यांच्या हक्काचे शेतीचे राखीव 1.97 टीएमसी पाणी करून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी 1.01 टीएमसी व सिना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी 4.50 ऐवजी 4.75 टीएमसी व सोलापूरच्या औद्योगिक वापरासाठी 2.15 टीएमसीऐवजी 3.26 टीएमसी पाणी देण्याचा प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. शासनाकडे तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या मंजुरीसाठी 3 ऑगस्ट 2018 च्या पत्राद्वारे पाठविण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

इंदापूरवासीयांना वाढीव पाणी द्या

इंदापूर ते दौंड तालुक्यापर्यंत उजनीच्या दोन्ही बाजूने अनेक गावातील पाणी योजना व शेतकर्‍यांच्या शेतीच्या पाणी योजना आहेत. सध्या या योजनांसाठी पाणी अपुरे पडत असून, शासनाने उजनीचे राखीव पाणी 9.6 टीएमसीवरून 12 टीएमसी वाढविण्याची मागणी इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यासह झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केली आहे.

प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना

उजनीवर तात्पुरत्या स्वरूपात परवानगी असलेले व बंद योजनांचे पाणी कमी करण्याचा प्रस्ताव असून, हे पाणी प्रवाही क्षेत्रासाठी वापरण्यात येणार असल्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविला आहे, असे सोलापूरचे भीमा कालवामंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव

तालुक्यातील शेतकर्‍यांनी 34 हजार एकरापेक्षा जास्त जमीन कवडीमोल दराने उजनी धरणाच्या निर्मितीसाठी दिली आहे. उजनीच्या काठच्या 52 गावातील शेतकरी स्वखर्चाने पाण्याचा उपसा करून शेती करीत आहेत. प्रशासनाने उजनीचे इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचे राखीव पाणी दुसर्‍या जिल्हाला देऊन उजनीचे वाळवंट करण्याचा व तालुक्यातील शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा डाव आखला आहे. सदरचा डाव आम्ही यशस्वी होऊ नाही. या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिला आहे.