उजनी जलाशयात सोडले मत्स्यबीज

0

भिगवण । उजनी जलाशयातील माशांचे प्रमाण कमी होत आहेत. याची दखल घेत जलसंपदा विभागाने मंगळवारी (दि. 22) 1 लाख 75 हजार कटला जातींचे मत्स्यबीज जलाशयात सोडले. यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणार्‍या मच्छिमारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

उजनी जलाशयात 20 वर्षांपासून मत्स्यबीजच सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे जलाशयात फक्त काही किरकोळ माशांच्या जातीच शिल्लक राहिल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात चिलापी जातीचाच मासा मोठ्याप्रमाणावर आढळत असून उजनीत सुरुवातीला आढळणारे प्रामुख्याने वाम, मरळ, कटला, आहेर, बोदवा, शिंगी, मांगूर रोहू, शिंगटा, गुगळी, झिंगा, गवत्या असे विविध प्रकारचे चवदार मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्यासाठी मासेमारांना अनेक वेळा आंदोलने करावी लागली. यासाठी मत्स्यमार कृती समितीची स्थापना देखील करण्यात आली. जलशयात 5 लाख मत्स्यबीज सोडले जावे, यासाठी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील बीज सोडण्यात आल्याने उजनी वरील मासेमारांना रोजगार मिळणार असल्याचे समितीचे राज्य उपाध्यक्ष सीताराम नगरे यांनी सांगितले.

उजनी धरणातील मासेमारी पहिल्यांदा मत्स्य विभागाच्या अखत्यारित होती. हस्तांतरानंतर ती जलसंपदा विभागाकडे देण्यात आल्याने जलसंपदा विभागाकडून मत्स्यबीज सोडण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. यामुळे उजनीतील मासेमारी संपुष्टात येण्याची चिन्हे मासेमारांकडून वर्तविण्यात जात होती. यावर्षी तर मासे सापडण्याचे प्रमाण अवघ्या 10 ते 15 टक्यांवर आल्याने मंगळवारी इंदापूर कुंभारगाव येथे ठिकाणी 40 हजार तर पळसदेव येथे 1 लाख 35 हजार मत्स्यबीज सोडण्यात आले. यावेळी जलसंपदा विभागाच्या भीमा उपसा शाखेचे अभियंता संजय मेटे, बिटधारक मंगेश नवघरे व मासेमार उपस्थित होते.