उजनी धरणग्रस्तांचा ‘बुडीमार’ आंदोलनाचा इशारा

0

संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन

इंदापूर : पुणे, सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर, सातारा जिल्ह्यातील उजनी धरणग्रस्तांचे पुर्नवसन हे सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आले. मात्र, या पुनर्वसीत धरणग्रस्तांना गेल्या चाळीस वर्षापासून विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या प्रश्‍नांबाबत शासन, महसूल विभाग तसेच राज्याच्या पुनर्वसन विभागाने ठोस निर्णय घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे असूनही गेल्या 40 वर्षांपासून त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. गेल्या चारवर्षापासून पुनर्वसनाचे कामही बंद आहे.

एकीकडे शासन धरणग्रस्तांसाठी विविध उपाययोजना करीत असल्याचे सांगत असतानाच प्रशासनाकडून प्रत्यक्ष कृती होताना दिसून येत नाही. त्यामुळे धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. 20 डिसेंबरपर्यंत धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत ठोस उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाही तर 20 डिसेंबरला उजनी धरणात बुडीमार आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्तांचे नेते तुकाराम सरडे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे, उपाध्यक्ष बाळासाहेब आरकीले, सरचिटणीस अंकुश पाडुळे, सदानंद कुलकर्णी, तुकाराम गुटाळ यांनी दिला आहे.

आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्या

उजनी धरणाचा प्रश्‍न, पाणी प्रश्‍न, गाळपड जमिनीचा प्रश्‍न सोडविणे, पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर येथील धरणग्रस्तांना पर्यायी जमीनीचे वाटप सुरू करावे, भुमिहीन शेतकर्‍यांच्या मिळालेल्या जमिनीवरील नवीन शर्थ शेरा कमी करण्यासाठी 50 टक्के रकमेची अट रद्द करावी, धरणग्रस्तांच्या गावठाण वस्तीमधील विविध सुखसुविधांची व मुलभूत कामांना तातडीने निधी द्यावा, धरणग्रस्तांच्या पाल्यांना नोकरी अनुषेश त्वरीत पूर्ण करण्यात यावा, धरणग्रस्तांच्या अडचणींसदर्भात प्रत्येक महिन्याला जिल्हास्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात यावे, धरणग्रस्त पुनर्वसीत गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश असून याबाबत प्रशासनाने ताततडीने कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.