उजनी धरणातील पाणी प्रदूषणात वाढ

0

राजेगाव । दौंड, कर्जत, इंदापूर, करमाळा या तालुक्यांतील काही भागांना उजनी धरण वरदान ठरले आहे. परंतु, उजनी धरणातील पाणी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचे गंभीर परिणाम पाण्याबरोबरच उजनीतील जैववैविध्यावर होत आहेत. उजनीच्या उथळ पाणलोट क्षेत्रात असणार्‍या नद्याच्या पात्राला याचा फटका बसत आहे. उजनीत जलचर मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे.

पाण्याच्या अस्वच्छतेमुळे नदीच्या संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र, उजनीच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस उपयास योजना अद्याप तरी करण्यात आलेली नाही, अशीच स्थिती राहिली तर याचे भविष्यात प्राणीमात्रांसह, नागरिकांना परिणाम भोगावे लागणार आहेत. उजनीचे वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय असताना प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच भूमिका घेत नसल्याने उजनीची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे दिसून येते. भीमानदीपात्रात वडापच्या सहाय्याने लहान-मोठे मासे पकडले जातात. हे मासे नदी किनारी लाखोंच्या संख्येने वाळवले जातात, त्यामुळे अधिक दुर्गंधी पसरते. नदी पात्रात मोठ मोठ्या यांत्रिक बोटीने दिवस-रात्र वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी दुषित होऊन जलचर प्राणी मोठ्या प्रमाणार मृत होत आहे.

नदीत दुषित पाणी
पावसाळा सुरू झाल्यावर भीमा नदी दुथडी भरून वाहते. तेव्हा पुणे जिल्ह्यातील सर्व घाण, राडारोडा उजनीत येवून थोपवतो. औद्योगिक क्षेत्राच्या नावाखाली अनेक मोठ्या कंपन्या प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त दुषित पाणी उजनीत सोडून देतात. उजनी पात्रात ठिकठिकाणी वाळू साठ्यांचा उपसा करण्यासाठी वाळू तस्कारांकडून नदी पात्रात जेलीटीनच्या सहाय्याने मोठे स्फोट केले जातात, त्यामुळेही प्रदूषण होत आहे.

अवैध वाळू उपसा
खानोटे, वाटलूज, राजेगाव हद्दीतील वाळू खेड (ता. कर्जत) हद्दीत यांत्रिक बोटींच्या सहाय्याने भीमानदी पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. वाळू उपशाच्या असंख्य यांत्रिक बोटी या तालुक्याची हद्द ओलांडून संपूर्ण दौंड तालुक्याची वाळू उपसत आहेत. तर परप्रांतीय नदी पात्रात लहान जाळ्याच्या सहाय्याने मासेमारी करून लहान मस्त्यबिजही उपसरत आहेत. उजनीच्या पात्रात लाखो रुपयांचा गौण खनिजचा साठा आहे. मात्र, प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याने या खनिजांची तस्करी वाढू लागली आहे.