इंदापूर । इंदापूर तालुक्यातील मौजे भाटनिमगाव, अवसरी, बेडशिंगे, भांडगाव, हिंगणगाव, देवाची रांझणी परिसरात उन्हाळाच्या तीव्रतेने भीमानदीचे पात्र कोरडे पडल्याने येथील नदीपात्रातील जलचर व लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. याच परिसरातील अवसरी, बाभुळगाव, बेडसिंगे, भाटनिमगाव, भांडगाव, रांजणी या गावातील उभी पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत. उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडून या जलचराना व पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
शेतकर्यावर दुष्काळाचे सावट
तीव्र ऊन्हामुळे नदीपात्रातील पाणी आटले आहे. लाखो जलचर चिखलात मृतावस्थेत विखुरलेले दिसत आहेत. असंख्य जलचर चिखलात अखेरच्या घटका मोजत आहेत. डबक्यातील मासे त्यांना पकडण्यासाठी त्या परिसरातील खवय्ये व अबालवृध्दांची कोरड्यापात्रातील चिखलात धांदल उडाल्याचे दिसून येते. या जलचरांच्या मृत्युबरोबरच पिके ही वाळून चालल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उजनी धरणातून पाणी सोडून या दोन्ही घटकांना जीवदान द्यावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांची धांदल उडाली आहे. दुष्काळाचे सावट उभे ठाकल्याने येथील बळीराजा चिंतातूर झाला आहे.