उजनी धरण मच्छीमार संघटनांचे आंदोलन स्थगित

0

दहा दिवसांत निर्णय घेण्याचे जलसंपदा अधिक्षक अभियंत्यांचे आश्‍वासन

इंदापूर : करमाळा तालुक्यातील उजनी काठचे गाव डिकसळ पूल येथील परप्रांतीय मच्छीमार हटाव, सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध, जलाशयाचा मासेमारीचा ठेका कोणत्याही प्रकारे काढण्यात येऊ नये या मागण्यांसाठी मच्छिमार संघटनेच्या वतीने हजारो मच्छिमार महिला, नागरिकांच्या उपस्थितीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. दहा दिवसांत याचा निर्णय घेऊ असे आश्‍वासन दूरध्वनीवरून जलसंपदा अधिक्षक अभियंता साळे यांनी दिल्यानंतर आंदोलन
मागे घेण्यात आले.

यावेळी दौलत शितोळे, अतुल खुपसे पाटील, सितारामभैय्या नगरे, सुभाष गुळवे, नंदकुमार नगरे, नितीन ईर्चे, राजेंद्र नगरे, हनुमंत मल्लाव, उज्वला वाघवले, परिणीती तारू, दिलीप गलांडे,  हनुमंत भोसले, निळकंठ शिंदे, पदाधिकारी मच्छिमार उपस्थित होते. यावेळी करमाळ्याचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, एपीआय प्रकाश वाघमारे, रविंद्र तेलतुंबडे, पोलिस उपनिरिक्षक नजीर खान, शिंदे, दिक्षित, सादीक यांच्यासह पोलिस कर्मच्यार्‍यांनी मोठा बंदोबस्त केला होता. भीमा उपसा सिंचन योजना अधिकारी नरेंद्र शिर्के, भारत गरड हे अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन विजय नगरे यांनी केले तर आभार नंदकुमार नगरे यांनी मानले.

पंधरा दिवसांत परप्रांतीय मच्छिमारांना घालवा

शितोळे म्हणाले, अनेक वर्षापासून उजनी जलाशयातील मच्छिमारांवर अन्याय होत आहे. दहा हजार हेक्टरवर सौरऊर्जाचा प्रकल्प झाला तर मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. खुपसे पाटील म्हणाले, शासन नियमानुसार परप्रांतीय मच्छिमारांना येथे येता येत नाही तरी संबंधीत अधिकार्‍यानी ताबडतोब याची दखल घ्यावी अन्यथा पंधरा दिवसात परप्रांतीय मच्छिमारांना योग्य धडा शिकवला जाईल असा इशारा खुपसे पाटील यांनी दिला. तसेच आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात बैठक घेऊन समस्या दूर केल्या जातील असे सांगितले.