उजनी पडू लागले कोरडे; जिल्ह्याच्या पूर्वभागावर पाणीटंचाईचे सावट

0

पुणे : गेल्या वर्षी पावसाळ्यात भरून वाहिलेले उजनी धरण आता एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात कोरडे पडू लागले असून, जिल्ह्याच्या पूर्व भागातील इंदापूर, बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यातील नागरिकांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील तीन महिने कसे काढायचे, याची विवंचना या भागातील नागरिकांना आत्तापासूनच सतावू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील 36 गावांनी पाण्याच्या टँकरची मागणी केली असून, काही गावांमधून पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण 110 टक्के भरले होते. या धरणाची क्षमता 110 टीएमएसी एवढी आहे. मात्र, सात महिन्यांत या धरणातून नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेल्याने एप्रिलच्या प्रारंभीच या धरणात अवघा 15 टक्के (सुमारे 20 टीएमसी) पाणीसाठा राहिला आहे. दरवर्षी कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. पण गेल्या सात महिन्यांत नदीपात्रात पाणी सोडले गेल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

धरणाजवळचे तलाव कोरडे
नदीतील पाण्यावर खालच्या भागातील अनेक गावांच्या पाणीयोजना अवलंबून असल्या, तरी या योजनांना लागणार्‍या पाण्यापेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याचा दावा इंदापूर तालुक्यातून केला जात आहे. भरलेले धरण अवघ्या सात- आठ महिन्यांत रिकामे झाल्याने आश्‍चर्यही व्यक्त करण्यात येत आहे. या धरणाला लागूनच इंदापूर तालुक्यातील भादलवाडी, मदनवाडी, पोंडेवाडी व पळसदेव असे मोठे तलाव आहे. हे तलावही कोरडे ठाक पडले आहेत.

इंदापूरकरांवर टंचाईची टांगती तलवार
इंदापूर शहराला तरंगवाडी तलावातून पाणीपुरवठा केला जातो. खडकवासला धरणाच्या आवर्तनावेळी या तलावात गेल्या महिन्यात पाणी सोडण्यात आले होते. पण आता तरंगवाडी तलावानेही तळ गाठण्यास सुरवात केली आहे. पालिकेने वीजबिल न भरल्याने पालिकेचे पाणीपुरवठ्याचे कनेक्शन मध्यंतरी तोडण्यात आले होते. हे बिल भरल्यानंतर ते पूर्ववत करण्यात आले. आता तरंगवाडीतील साठा झपाट्याने कमी होत असल्याने एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यातच इंदापूरलाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

टँकरचे प्रस्ताव वाढणार
इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावांना आत्ताच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून, 36 गावांनी आत्ताच पंचायत समितीकडे टँकरचे प्रस्ताव सादर केले आहेत. पुढील पंढरवड्यात या प्रस्तावांची संख्याही वाढणार आह. बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यातील अनेक गावांतही अशीच स्थिती आहे. एकीकडे कडक उन्हामुळे अंगाची लाही हो असताना दुसरीकडे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागते आहे. त्यामुळे आता या तालुक्यांतील पंचायत समित्यांकडेही टँकरची मागणी होऊ लागली आहे. एप्रिलच्या मध्यानंतर जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागणार आहे.

पाणी विकत घेण्याची वेळ
इंदापूर व बारामतीतील अनेक गावाींल ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. सुमारे चार हजार लिटरच्या टँकरसाठी सातशे रुपये ग्रामस्थांना मोजावे लागतात. अनेक ठिकाणी असे खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्यास सुरवात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टँकरची मागणी झाल्यास, टँकर सुरू करण्यास विलंब करू नये, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

कर्नाटकचीही मागणी
कर्नाटकच्या उत्तर भागातील जिल्ह्यांतही पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाने उजनीतील 4 टीएमसी व कृष्णेच्या 2 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. कर्नाटकच्या या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे, या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.