‘उज्ज्वला’मुळे एलपीजीचा वापर वाढला

0

जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची अंमलबजावणी : ग्रामीण भागात 88 टक्के गॅसचा वापर

पुणे : जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना एलपीजी गॅसजोडणी देण्याबाबत राबविलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील एलपीजी गॅसचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण सुमारे 88 टक्के झाले आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे एक लाख 27 हजार 399 लाभार्थी आहेत. इंडियन ऑइलने 17 हजार 640, भारत पेट्रोलियमने 52 हजार 59 आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने 57 हजार 700 एलपीजी गॅसजोडणी दिल्या आहेत. डिसेंबर 2018 पर्यंत ग्रामीण भागामध्ये एलपीजीचा वापर सुमारे 69 टक्के होता. ते प्रमाण 88 टक्के झाले आहेत, असे जिल्हा नोडल अधिकारी अनघा गद्रे यांनी सांगितले.

योजनेची व्याप्ती वाढवली

या योजनेची व्याप्ती गेल्यावर्षी वाढविण्यात आली. त्यामध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबांबरोबरच आणखी सात नवीन वर्गांचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील कुटुंबे, प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, सर्वाधिक मागासवर्गीय (एमबीसी), चहा मळ्यातील जमाती आणि नदी बेटांवर राहणारे लोक यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधितांना अनामत रक्कम न घेता एलपीजी कनेक्शन देण्याचाही निर्णय झाला आहे, असे गद्रे यांनी सांगितले. गॅस जोडणी देण्यात आल्यावर त्यापैकी सुमारे 76 टक्के लाभार्थी एलपीजी सिलिंडर परत भरण्यासाठी आले. गॅसचा शंभर टक्के वापर करण्यासाठी शिबिरे घेऊन प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

धुराचे प्रमाण कमी

सामाजिक संस्थच्या सर्वेक्षणानुसार चुलीवर एक तास स्वयंपाक करतेवेळी 400 सिगारेट एवढा धूर महिलांच्या शरीरात जातो. याचा त्रास महिलांना जाणवतो. प्रामुख्याने चाळीशीनंतर याचा त्रास सुरू होतो. त्यामुळे पारंपारिक इंधन म्हणून लाकडाचा वापर न करता स्वयंपाकांचे इंधन म्हणून एलपीजीचा वापर करण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे स्वयंपाकघरातील प्रदूषण नाहीसे झाले आहे, अशी माहिती गद्रे यांनी दिली.

५ किलोचा सिलिंडरही उपलब्ध

पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) 1 लाख 27 हजार 399 महिलांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ 100 रुपये भरून महिलांना ही गॅस जोडणी देण्यात आली आहे. दरम्यान, ज्या महिलांना 14 किलोचा गॅस सिलिंडर परवडत नसेल, त्यांच्यासाठी 5 किलोचा सिलिंडरही उपलब्ध करून दिला जात आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मार्च 2019 पर्यंत बीपीएल कुटुंबांतील महिला सदस्यांना 5 कोटी एलपीजी कनेक्शन आणि मार्च 2020 पर्यंत अतिरिक्त 3 कोटी एलपीजी कनेक्शन देण्यासाठी 12 हजार 800 कोटी एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, ऑगस्ट 2018 मध्येच गॅस पुरवठा करणार्‍या कंपन्यांनी 5 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती गद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिलिंडर पुनर्भरणासाठी मिळणार कर्ज

गॅसजोड मिळालेल्या महिलांना सिलिंडर खरेदीसाठी आगाऊ पैसे देऊ न शकणार्‍या महिलांना सिलिंडर संपल्यानंतर पहिल्यावेळेस सिलिंडर पुनर्भरणासाठी घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या कर्जाची वसुली सातव्या सिलिंडरपासून सुरू होणार आहे. तसेच जिल्ह्यात योजनेअंतर्गत मिळालेल्या गॅसचे पुनर्भरण करण्याचे प्रमाण 76 टक्के एवढे आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात 9,905, पुरंदर 7,802 , दौंड 11 हजार, इंदापूर 15,800, जुन्नर 14 हजार, तर वेल्हे तालुक्यात 1,477 गॅस जोडणी देण्यात आली आहे.