उज्ज्वल देश घडवायचा असेल तर वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे

0

जळगाव । प्रत्येक व्यक्तीला आपला जीव प्रिय असतो. त्यातच आपल्याला घडवतांना अनेकांचे योगदान असते त्यामुळे आपल्या जीवाची किंमत ही अमूलाग्र असते. मात्र काही लहान लहान चूकांमुळे व अतिघाईमुळे आपल्याला रस्ते अपघात जीव गमवावा लागतो. या अपघातात मृत्यूमूखी पडणार्‍यांमध्ये युवकांची संख्या अधिक आहे. आपल्याला जर उज्वल देश घडवायचा असेल व आई-वडीलांचे स्वप्न साकार करायचे असेल तर युवकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत नवी मुंबई येथील तज्ज्ञ विनय मोरे यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
जळगाव जिल्हा पोलिस दल व जिल्ह्यातील महाविद्यालये व विद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने आज मू.जे महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत वाहनधारकांचे मृत्यू’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे होते तर व्यासपीठावर अप्पर पोलिस अधिक्षक बच्चन सिंग, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, सकाळ माध्यम समूहाचे निवासी संपादक विजय बुवा, पोलीस उप अधिक्षक सचिन सांगळे, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमूख, सतिश भामरे, प्रसन्न कुमार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करुन नियमित वाहतूकीचे नियम पाळण्याच्या सल्ला दिला.

कागदाची झेरॉक्स होते मात्र आयुष्याची झेरॉक्स करता येत नाही
पूढे बोलतांना श्री.मोरे यांनी सांगितले की, आजच्या युवकांमध्ये धुम स्टाईलने गाडी चालवण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. शाळा, महाविद्यालयाच्या आवारात देखील मुले याच स्टाईलने वाहने पळवितात. यामुळे जर अपघात घडला तर त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया तर जातेच मात्र नाहक त्रास देखिल सहन करावा लागतो. जो पर्यंत वाहन पार्कींग मध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षीत नसतात. तसेच परवाना नसतांना देखील अनेक लोक वाहने चालवितात तर ज्यांच्याकडे परवाना आहे ते पोलीस कारवाई करतील या भितीपोटी लायसेन्स सोबत बाळगतात मात्र स्वत:च्या जीवना विषयी ते गंभीर नसतात जरी आरटीओ विभागातर्फे वाहन परवाना मिळत असेल तरी तो आपल्याला वाहन परीपूर्ण पणे चालविता येते की नाही हे पाहुनच स्वीकारला पाहिजे आणि याची सुरूवात आपल्यापासूनच तरूणांनी केली पाहिजे. रस्त्यांवर पहिला अधिकार हा माणसाचा आहे कारण अगोदर माणुस आला मग रस्ते त्यामुळे वाहन चालकांनी मानसिकता चांगली ठेवूनच वाहने चालविली पाहिजे. आयुष्यात अपघात हा कुणालाही होत असतो तो श्रीमंत असा वा गरीब, दुसर्‍यांच्या अनुभवातून मात्र आपण शिकायला हवे, आपण कागदाची झेरॉक्स काढू शकतो मात्र आयुष्याची नाही. त्यामुळे काळजीपूर्वक वाहने चालवावीत, आज पथनाटय व अन्य माध्यमांच्या आधारातून वाहतुकी संदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. यातूनच रस्ते अपघातांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल असे ही त्यांनी यावेळी सांगितली.

अपघातग्रस्तांना मदत करा
प्रत्येकाने नेहमी अपघात झाल्यावर अपघात ग्रस्तांना तात्काळ मदत केली पाहिजे, आपल्या देशात व्यसन करून वाहने चालविणे व यातून होणार्‍या अपघाताचे सर्वाधिक प्रमाण आहे. अपघात घडल्यानंतर त्या व्यक्तीला जर तत्काळ मदत मिळाली तर कदाचित त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो त्यामुळे कधीही मदत करतांना मागे जावू नका.

नियमांचे पालन करा : पोलीस अधिक्षक कराळे
जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण देखिल अधिक आहे दररोज दोन जणांचा तरी बळी जात असतो. यात तरुणांची संख्या ही अधिक आहे. त्यातच घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने आई वडीलांचा सहाराच राहत नाही त्यामुळे अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतुक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. शाळा, महाविद्यालयातील तरूणांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा असे आवाहन पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी यावेळी दिले.