पुणे । कोरेगाव भीमा या ठिकाणी 1 जानेवारी रोजी उसळलेल्या हिंसाचारात राहुल फटांगळे या तरुणाचा बळी गेला. फटांगळेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी राहुलचा मावस भाऊ तेजस धावडे याने केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तेजस धावडेने ही मागणी केली. या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय जाधव, तुषार काकडे यांचीही उपस्थिती होती. भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात 1 जानेवारीला राहुलचा मृत्यू झाला. या घटनेला बुधवारी 10 दिवस पूर्ण होत आहे. सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चातर्फे बंद पाळण्यात येण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यात तथ्य नाही अशी माहिती तेजस धावडे यांनी दिली. तसेच बुधवारी कान्हूर मेंसाई या ठिकाणी शोकसभा घेण्यात येणार आहे असेही त्याने सांगितले.
राहुल फटांगळेला व्यायामाची आवड होती त्यामुळे त्याच्या नावाने व्यायामशाळा उभारण्यात यावी अशीही मागणी तेजस धावडे यांनी केली. भीमा कोरेगाव आणि त्या शेजारच्या गावांमध्ये हिंसाचार उसळला. या हिंसाचारात गावकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. हे नुकसान राज्य सरकारने भरून द्यावे त्याची फक्त घोषणा न करता बॉण्डवर लिहून द्यावे अशीही मागणी धावडे यांनी केली.
1 जानेवारी रोजी पुण्याजवळच्या भीमा कोरेगाव या ठिकाणी हिंसाचार उसळला. या हिंसाचारात राहुल फटांगळे या तरूणाचा मृ्त्यू झाला तर मोठ्या प्रमाणावर कार आणि इतर चाकी वाहने यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या सगळ्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदही करण्यात आला. आता राहुल फटांगळेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी त्याचा मावस भाऊ तेजस धावडेने केली आहे.मंगळवारी पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात 12 जणांना अटक केली असून यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडीदेखील सुनावली आहे.
प्रकाश आंबेडकरांचा संदेश व्हायरल
‘घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे,’ असा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा कार्यकर्त्याना उद्देशून दिलेला संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 3 जानेवारीला झालेल्या शांतीपूर्ण महाराष्ट्र बंदच्या आंदोलनाने भाजपच्या सत्तेची खुर्ची हलू लागली आहे. त्यामुळे या आंदोलनात उतरलेल्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे.त्यांना पोलिसांद्वारे मारहाण केली जात आहे,आंदोलनातील महिलांना रात्री पोलीस अटक करीत आहेत.एकंदरीत आंदोलकांना महाराष्ट्र सरकार पोलिसांच्या माध्यमातून घाबरवून नामोहरम करीत आहे,असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. यासंबंधात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोंबिंग ऑपरेशन थांबविण्याची विनंती केली, ते थांबविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. परंतु मुख्य मंत्र्यांवर मनुवादी आणि कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव आहे. त्यामुळे मुख्य मंत्री आपले आश्वासन पाळताना दिसून येत नाही, असा आरोप संदेशात केला आहे. त्यामुळे समाजाने व आंदोलनातील कार्यकर्त्यांनी हिमत सोडू नये.मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.सरकारने या आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे ताबडतोब थांबवावेतयासाठी मी कार्यरत आहे.धीर सोडू नका.आपल्यावर अन्याय करणार्या सरकारशी लढताना थोडेसे खंबीर रहा. अपप्रचाराला बळी पडू नका. वकिलांची टीम सहकार्यासाठी तयार आहे,असेही म्हटले आहे.
फटांगडे कुटुंबीयांना 10 लाखांची मदत
सणसवाडी येथे 1 जानेवारीला समाज कंटकांनी घडून आणलेल्या दंगलीत सणसवाडी येथील राहुल फटांगडे याची हत्या झाली. दि 9 जानेवारीला सायंकाळी सणसवाडी येथे फटांगडे कुटुंबाची अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांनी भेट घेऊन आई जनाबाई व लहान बंधू विष्णू यांचे सांत्वन केले यावेळी शासनाने दंगलीत मृत्यू पावलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचा निधी जाहीर केला होता. यावेळी भारतीय स्टेट बँकेचा 10 लाख रुपयांचा धनादेश आई व बंधू विष्णू याना दिला. यावेळी प्रांताधिकारी भाऊ गलांडे, शिरूर, तहसीलदार रणजित भोसले, उप विभागीय अधिकारी राम पठारे, सणसवाडी तलाठी अश्विनी कोकाटे, गाव पोलीस पाटील दत्ता माने उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दंगलीस कारणीभूत असलेल्यांचा कसून तपास चालू असल्याचे सांगितले.
भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीमध्ये निष्पाप बळी गेलेल्या तरुण बांधव राहुल फटांगळेे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जातीवादी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना त्वरित अटक करून कलम 302 व अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणामध्ये भारत कांबळे, भिकूजी पौर्णिमा, अतिक मोमीर, अशोक आठवले, इकबाल अन्सारी, अमीन कुरेशी, कृष्णा सोनकांबळे, किरण जगताप, रमा आठवले, निलेश आल्हाट, इम्तियाझ पठाण, जमीर शेख, जावेद खान, अहमद सय्यद आदी सहभागी झाले होते.