बोदवड। मागासलेपणा दूर सारून प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हायचे असेल, तर शिक्षणाची कास धरा. पालकांनी इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना अधिकाधिका चांगले शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असा सल्ला जालना येथील उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी शिरसाळा मारुती मंदिरावर झालेल्या कार्यक्रमात दिला. हटकर धनगर समाजातर्फे तालुक्यातील शिरसाळा येथे दहावी, बारावीतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
धनगर समाजातर्फे 100 विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रभाकर पाटील, संजय पाटील, सरपंच प्रकाश पाटील, पुरुषोत्तम पाटील, रामराव पाटील, सुनील पाटील, चंदन पाटील, विनोद चौधरी आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपजिल्हाधिकारी इतवारे यांच्यासह सुप्रिया गव्हारे, विश्वनाथ पाटील, माजी सभापती मुक्ताबाई पाटील, नगरसेवक सदाशिव ढेकळे, संतोष पाटील, धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रामेश्वर पाटील, सुभाष पाटील, संदीप सावळे, दिलीप सोनवणे, डी.के.पाटील, योगेश पाटील उपस्थित होते. दहावी, बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या 100 विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यानंतर उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी संवाद साधला. जीवनात यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे, त्यासाठी आपली बलस्थाने ओळखावी असे सांगितले. खेड्यापाड्यात राहणारा धनगर समाज विविध शाखांमध्ये विभागला आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिका, संघटीत व्हा संघर्ष करा, हा कानमंत्र अंगीकारावा, असेही ते म्हणाले. बोदवड तालुक्यात पहिल्यांदाच हटकर धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या अनोख्या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांसोतच त्यांचे आई-वडील, शिक्षकदेखील भारावले होते. पारंपरिक शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणावर भर द्यावा. यामुळे नोकरीसाठी वणवण भटकंती करावी लागणार नाही. स्वयंरोजगारातून स्वत: स्वावलंबी होता येईल, असे उपस्थितांनी सांगितले.