पाईप लाईन लिकेजमुळे पाल भागाकडून कामाला सुरुवात
रावेर- रावेर-भाटखेडा-पाल या रस्त्यावरील खड्डे जीवघेणे झाले असल्याने हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी पालिकेच्या नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले मात्र उपविभागीय अभियंता यांच्यासह तीन शाखा अभियंता कार्यालयात हजर नसल्याने नगरसेवकांनी उपविभागीय अभियंत्याच्या खुर्चीला हार टाकून गांधीगिरी केली होती. या प्रकाराची उपविभागीय अभियंता इमरान शेख यांनी गंभीर दखल घेत या रस्त्याची नगरसेवकांच्या उपस्थितीत पाहणी केल्यानंतर शुक्रवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली. रावेर भागाकडील रस्त्यावर पाईप लाईन लिकेज असल्याने पाल भागाकडून सुरुवातीला दुरुस्तीला सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.
आमदारांच्या निधीतून रस्ता काम मंजूर
आमदार हरीभाऊ जावळे यांच्या निधीतून या रस्त्याचे काम मंजूर असल्याचे माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन व माजी शिक्षण सभापती सुरेश धनके यांनी सांगितले. नगरसेवक यशवंत दलाल, भाजपा शहराध्यक्ष मनोज श्रावगे, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, सरचिटणीस रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
रस्त्याच्या कामासाठी बाहेर होतो
नाशिक येथे सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत बैठक असल्याने तेथे आपण गेलो होतो, असे उपविभागीय अधिकारी ईम्रान शेख म्हणाले तर शाखा अभियंता व्ही.के.तायडे, एम.बी.तायडे, एच.डी.पांडव साईटवर गेल्याचे त्यांनी सांगितले.