उड्डाणपुलाअभावी रेल्वे गेटवर जीवघेणी कसरत

0
मांजरी । गेल्या काही वर्षांत वेगाने नागरीकरण झालेल्या भागांमध्ये मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द, आव्हाळवाडी, वाघोली व कोलवडी या गावांचा समावेश होतो. येथे वस्ती वाढली तशी वाहनेही वाढली. या नागरिकांना हडपसर व पुणे शहरात येण्यासाठी प्रमुख व जवळचा मार्ग आहे तो मांजरी बुद्रुकचा रस्ता ज्यावर रेल्वेचे रेल्वेगेट क्रमांक़ तीन क्रॉसिंग आहे. येथे उड्डाणपूल नसल्याने रेल्वेगेट बंद होऊन पुन्हा सुरू होताना वाहतूककोंडी होत आहे. रेल्वेगेट बंद होताना आणि ते उघडल्यानंतर दुसरी रेल्वे अगदी जवळ येईपर्यंत नागरीक आपल्या वाहनांसह रेल्वेरूळ ओलांडत असतात. उड्डाणपूल नसल्याने तसेच वाहतूक पोलिस येथे तैनात नसल्याने रेल्वेगेटवर नागरिक रोजच आपला जीव धोक्यात घालत आहेत.
रेल्वेगेट बंद झाल्यानंतर होते वाहतूककोंडी
मुंबई-पुणे-हैदराबादकडे येणार्‍या-जाणार्‍या रेल्वेगाड्यांची व इतर रेल्वेगाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे मांजरी बुद्रुक रेल्वेगेट वारंवार बंद असते. सकाळी व संध्याकाळी रेल्वेगेट बंद झाल्यानंतर रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रेल्वेगेट उघडल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाहने समोरासमोर येऊन रेल्वेरूळावरच वाहतूककोंडी होते. त्यातच दुसरी रेल्वे येऊन रेल्वेगेट बंद होण्याची वेळ येते. या गेटवर रेल्वेकडून कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी या कर्मचार्‍यांचा विरोध झुगारून नागरिक गेट बंद होण्याच्या स्थितीतही ये-जा सुरू ठेवत असल्याने मोठ्या दुर्घटनेची परिस्थिती रोजच येथे निर्माण होत आहे. रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल नाही. वाहनांची संख्या वाढलेली त्यातच अवजड वाहने अधिक त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर मांजरीकरांना वाहतूककोंडीचा त्रास रोज सहन करावा लागत आहे. सकाळी व संध्याकाळी रेल्वेची वारंवारिता अधिक त्याचवेळी वाहनांची संख्याही अधिक राहत असल्याने वाहतूककोंडी होऊन गेटच्या दोन्ही बाजूंना वाहनांची रांग लागलेली असते.
दुभाजक आणि वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी
 मांजरी रेल्वे रेल्वेगेटवर रोजचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. वास्तविक गेल्या वर्षभरात याठिकाणी रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही उड्डाणपूलाचे काम प्रत्यक्षपणे सुरू नाही. त्यातच रेल्वेगाड्यांची ये-जा वाढली आहे. वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रेल्वेगेट बंद झाल्यावर व उघडल्यावर रेल्वेरूळावर मोठी वाहतूककोंडी होते. मोठ्या अपघाताचा धोका दररोज निर्माण होतो. उड्डाणपूल होईल तेव्हा होईल परंतु सध्यातरी रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंना दुभाजक बसवावेत. तसेच सकाळी बारा वाजेपर्यंत व संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांची नेमणूक करून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी मागणी हवेली तालुका पंचायत समितीचे उपसभापती अजिंक्य घुले यांनी केली आहे.
सिग्नलची आवश्यकता
 देवळाई चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या चौकात वाहतूक सिग्नल आवश्यक झालेले आहे. या ठिकाणी सिग्नल बसविल्यानंतर भरधाव वेगात येणार्‍या वाहनांच्या वेगावर नियंत्रण बसू शकेल. यामुळे संभाव्य अपघातही टाळता येऊ शकतील.