उड्डाणपुलाची दुरूस्ती न झाल्यास आंदोलन करू

0

रक्षक प्रतिष्ठान संघटनेची मागणी

पिंपरी : पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजीमंडई लगतच्या इंदिरा गांधी उड्डाणपुलाची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी रक्षक प्रतिष्ठान संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मागील अनेक महिन्यांपासून या कठड्याचे ग्रील तुटले आहे. पादचारी तसेच लहान मुले याठिकाणाहून ये-जा करत असतात. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला. आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करण्यात आली. निवेदने देण्यात आली. परंतु, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

लवकरात लवकर या पुलाची दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रक्षक प्रतिष्ठानचे सरचिटणीस जावेद वालीकर, उपाध्यक्ष अक्षय पवार, नितीन कांबळे, जमीलभाई औटी, रियाज जमादार, अर्चना मेंगडे यांनी याबाबत निवेदन दिले आहे.