चिंचवड : रावेत ते सांगवी बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख, साई चौक येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची तसेच वाय जंक्शन येथील ग्रेड सेपरेटरच्या कामाची भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी बुधवारी पाहणी केली. तसेच दोन्ही कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या. औंध-रावेत उड्डाणपूल एक बाजू जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करावा. कोकणे चौक ते साई चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सायकल ट्रॅक मूळ रस्त्यात विलीन करावे. जेणेकरून वाहतुकीस जास्त जागा उपलब्ध होईल, अशा सूचना नगरसेवक काटे व नगरसेविका कुटे यांनी केल्या. साई चौक येथील शिवार चौक ते सावित्रीबाई फुले उद्यानापर्यंत अंडरपास कामाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता खलाटे, उपअभियंता नाईक, कनिष्ठ अभियंता तालीखेडे, महापालिकेच्या बीआरटीएस विभागाचे उपअभियंता संदेश खडतरे, कनिष्ठ अभियंता अभिजित दहाडे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, कनिष्ठ अभियंता कावळे, पाणीपुरवठा विभागाचे धुमाळ आदी उपस्थित होते.
साई चौक हा मुख्य रहदारी तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक दळणवळण असलेले चौक आहे. परंतु या परिसरामध्ये वाहतूक विषयी समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालले होते. या उड्डाणपुलामुळे हिंजवडीमध्ये काम करणारा मोठा वर्ग व रहिवाशांची वाहतूककोंडीतून मुक्ती होणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाकड, डांगे चौक, नाशिक फाटा आणि पुणेमध्ये जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर होऊन या परिसरातील वाहतूककोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे.