उड्डाणपुलाला अवजड वाहनांच्या धडकेमुळे धोका

0

हडपसर : सोलापूर रस्त्यावरील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरला अवजड वाहनांच्या धडकेमुळे धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी गाडीतळावरील पुलालाही अशा प्रकारचा धोका निर्माण झाला होता. त्यावर पालिकेने रस्त्यावर पिलरच्या बाजूला दुभाजक टाकल्याने जास्त उंचीची वाहने पुलाच्या बाजूने जात नसल्याने पिलरला ती धडकत नाहीत. अशीच उपाययोजना या पुलांच्या पिलरच्या बचावासाठी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

जमिनीपासून पिलरची उंची कमी असल्याने अवजड वाहने त्याला धडकतात. परिणामी, पुलाला सारखे हादरे बसत आहेत. गाडीतळावरील पुलाच्या पिलरला असाच धोका निर्माण झाला असता, पालिकेने त्या पिलरच्या खाली रस्त्यावर दुभाजक टाकले. त्यामुळे तेथून अवजड वाहनांना जाता येत नाही. तशीच व्यवस्था येथे करावी लागेल, तरच या पिलरचे होणारे नुकसान थांबेल. त्यामुळे अशी दुरुस्ती दुभाजक टाकून पालिकेने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पुण्याकडून हडपसरकडे व मुंढवा रस्त्यावरून हडपसरकडे येणारी वाहने या पुलाच्या पिलरला धडकतात. ज्या वाहनांची उंची जास्त आहे अशी अवजड वाहने पुलाच्या बाजूने जाताना पुलाच्या खाली असलेल्या आडव्या पिलरला धडकल्याने त्याचा टवका उडत आहे. या पिलरमधील लोखंडी गज आता दिसू लागले आहेत.