उड्डाणपुलावरून रिक्षा पडली खाली

0

जळगाव : महामार्गावरील शिवकॉलनी उड्डाणपूलावरुन गणेश कॉलनीमध्ये परतत असलेल्या मालवाहु रिक्षाला मागून ट्रकने धडक दिली. या अपघातात रिक्षा चक्क उड्डाणपूलावरुन खाली फेकली गेली. यात रिक्षा चालक जखमी झाला आहे. तर त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चालका सोबत असलेल्या तरूणाला किरकोळ जखमा झाल्या. ही घटना दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील गणेश कॉलनीमध्ये नंदु पालीवाल यांचे पालीलाल टेंन्ट हाऊसचे दुकान आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महाविद्यालयामध्ये त्यांनी टेंन्ट साहित्य दिले होते. हे साहित्य परत आणण्यासाठी पालीवाला यांच्याकडे असलेले रिक्षाचालक कैलास दामू सावळे, कामगार अनिल शिरसाठ हे रिक्षा क्रमांक एम.एच.19 एस.884 ने गेले होते. साहित्य रिक्षामध्ये भरुन ते जळगाव येत होते. यादरम्यान चालक कैलास सावळे यांच्या रिक्षेला एरंडोल कडून भुसावळकडे जाणार्‍या ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात रिक्षा शिवकॉलनी उड्डाणपूलावरुन खाली फेकली गेली. 50 ते 60 फुटांपर्यत रिक्षा फेकली गेल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले.

जिल्हा पेठ, रामानंद पोलीस घटनास्थळी
ट्रकच्या धडकेनंतर रिक्षा उड्डाणपुलाच्या खाली फेकल्यागेल्यानंतर चालक कैलास सावळे यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. तर अनिल शिरसाठ यांना सुदैवाने ईजा झाली नाही. मात्र, रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघात होतच माजी नगरसेवक मंगलसिंग पाटील यांनी नंदू पालीवाल यांना फोन लावुन माहिती सांगितली. पालीवाल यांच्यासह चेतन पाटील जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील मनोज कोळी, रवि तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलीसांच्या मदतीने घटनास्थळून जखमी कैलास सावळे यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

ट्रक चालक फरार
एरंडोलकडून येणार्‍या ट्रकने रिक्षेला धडक देताच घाबरलेल्या अवस्थेत तीन ते चार वाहनांना कट मारुन पळ काढला. दरम्यान महामार्गावरील रिक्षा शिवकॉलनी उड्डाणपूलावरुन खाली फेकली गेल्याने ती पाहण्यासाठी महामार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती. यामूळे काही काळासाठी वाहनाची कोंडी झाली होती. मात्र, या घडलेल्या घटनेबाबत कोणतीही तक्रार दिली नसल्याने पोलीसात याबाबत नोंद नाही. यानंतर टेन्ट हॉऊसचे मालक नंदू पालीवाल यांनी घटनास्थळी येवून रस्त्यावर फेकलेले गेलेले साहित्य कामगारांच्या मदतीने जमा केली. व अपघात ग्रस्त रिक्षा देखील दुसर्‍या मालवाहून रिक्षात ठेवून घेवून गेले. या अपघातामुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाल्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.