पिंपरी-चिंचवड : निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने येथे उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता आहे. प्रस्तावित उड्डाणपुलाचे डिझाईन पाहता; भविष्यात येथे मेट्रो झाली तरी हा उड्डाणपूल अडसर ठरत नाही. खुद्द महामेट्रोने रेल कार्पोरेशनने तसा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे उड्डाणपूलप्रश्नी कोणीही उगाच राजकारण करू नये, असा टोला मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी हाणला आहे. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वादात मनसेची उडी
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येणारा उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरच्या विषयावरून सध्या सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांच्यात जुंपली आहे. या वादात आता मनसेने उडी घेतली आहे. भक्ती-शक्ती चौकात वारंवार होणारे अपघात लक्षात घेता, याठिकाणी उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर उभारण्याची नागरिकांची मागणी आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी महापौर मंगला कदम व स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करताना मदत केली. मात्र, काही मंडळी उड्डाणपुलाची उपयुक्तता लक्षात न घेताच चांगल्या कामात विघ्न आणण्याचे काम करत आहे, असा टोला सचिन चिखले यांनी भाजपचे अमोल थोरात यांचे नाव न घेता हाणला.