उड्डाण पुलाची कामे त्वरित मार्गी लावा

0

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत यांची सूचना

खेड शिवापूर । पुणे-सातारा महामार्गावरील उड्डाण पुलाची प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावा, तसेच वारंवार होणार्‍या अपघातस्थळी योग्य त्या उपययोजना त्वरित करा, अशी सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना केल्या. पुणे-सातारा रस्त्यावर वारंवार होणार्‍या अपघातांबाबत उपाययोजनांसाठी खेड शिवापूर येथे बुधवारी बैठक बोलविण्यात आली होती. त्यावेळी अस्पत बोलत होते.

अपघात वाढले
गेल्या काही दिवसांत या रस्त्यावर शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान अपघतांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग रिलायन्स इन्फ्रा आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदेवाडी ते सारोळा दरम्यानची प्रलंबित रस्त्याची कामे आणि अपघातस्थळांची या अधिकार्‍यांनी पाहणी केली.

उपाययोजना आखा
पुणे-सातारा रस्त्यावर खेड शिवापूर येथील दर्गा फाटा, चेलाडी फाटा आणि सारोळा या ठिकाणी सर्वाधिक अपघात झाले आहेत. याठिकाणी उड्डाण पुलाची, तसेच रस्त्याची इतर कामे प्रलंबित असल्याने अपघाताचे प्रमाणे वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्त्याची प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत. तसेच याठिकाणी होणार्‍या अपघातांची कारणे शोधून आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशा सूचना अस्पत यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्राच्या अधिकार्‍यांना केल्या.

उपाय योजण्याचे आश्‍वासन
महामार्गावर आवश्यक ठिकाणी फलक, दिवे लावण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. अपघात होऊ नये यासाठी संबंधित ठिकाणी फलक, दिवे आणि आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्यात येतील. तसेच रस्त्याची प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.