उत्कर्ष मंदिर, शिव शिक्षण संस्था विजयी

0

मुंबई । आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित शालेय मुंबई सुपर लीग कबड्डीत उत्कर्ष मंदिर-मालाड शाळेने सरस्वती विद्या मंदिरचा 11 गुणांनी पराभव केला. चढाईपटू आदित्य अंधेर व बचावपटू सिध्देश चव्हाण यांच्या अप्रतिम खेळामुळे उत्कर्ष मंदिरला पहिल्या डावात पिछाडीवर राहूनदेखील विजय मिळवता आला. हर्ष पाटीलच्या दमदार चढायामुळे शिव शिक्षण संस्थेने आयईएस-भांडूप शाळेवर 28 गुणांनी विजय मिळवून पहिला साखळी जिंकला.

मुंबई शहर, उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील शाळांच्या सहभागाने करीरोड-पूर्व येथील बालवीर पटांगणात झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यातून उत्कर्ष मंदिर-मालाड, शिव शिक्षण संस्था-सायन, सरस्वती विद्या मंदिर-घाटकोपर, आयईएस-भांडुप इत्यादी 4 संघांनी सुपर लीग गटात प्रवेश मिळविला. चढाईपटू सिद्धेश हगवणेच्या सुंदर खेळामुळे सरस्वती विद्या मंदिरने मध्यंतराला 26-24 अशी आघाडी घेतली होती. परंतु उत्तरार्धात आदित्य अंधेरच्या चौफेर चढाया व सिध्देश चव्हाणच्या पकडीच्या खेळामुळे उत्कर्ष मंदिर शाळेने 55-44 अशी बाजी मारली. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, स्पोर्ट्स असोशिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन, बालवीर क्रीडा मंडळ, राष्ट्रीय मिल मजदूर संघ व सिंधुदुर्ग बँक यांच्या सहकार्याने सुरु असलेल्या दुसर्‍या साखळी सामन्यात शिव शिक्षण संस्थेच्या हर्ष पाटीलच्या चढाया थोपविण्यात आयईएस-भांडूप शाळेच्या क्षेत्ररक्षकाना अपयश आले. तसेच आयईएस शाळेला समीर देवळेकरने चढाईत मिळवून दिलेले गुण टिकविता आले नाहीत. त्यामुळे शिव शिक्षण संस्थेने पहिल्या डावात 37-15 अशी आघाडी घेतली. दुसर्‍या डावात शिव संस्थेच्या अथर्व बांदलने बहारदार पकडी करीत प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण बोथट केले. परिणामी शिव शिक्षण संस्थेने 65-37 असा मोठा विजय मिळवला.