मुजफ्फरनगर । उत्तरप्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरल्याने झालेल्या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
पुरीवरुन हरिद्वारला जाणारी कलिंग उत्कल एक्स्प्रेस गुरुवारी रात्री पुरीवरुन निघाली होती. हरिद्वारला पोहोचण्यासाठी दोन तासांचा अवधी असताना शनिवारी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास मेरठ-मुजफ्फरनगर दरम्यान खतौलीजवळ एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरले. यात एक्स्प्रेसचे दोन डबे एकमेकांवर चढले होते. तर एक डबा रेल्वे रुळालगतच्या घरात घुसला. अपघातात दहा जण ठार तर 50 जण जखमी झाल्याचे वृत्त असून जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेल्वेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून सध्या घटनास्थळी स्थानिक आणि पोलीस मदतकार्य राबवत आहेत. मदतकार्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जाणार असून एनडीआरएफची तुकडी मुजफ्फरनगरच्या दिशेने रवाना झाली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे स्वतः त्याचा आढावा घेत आहेत.