नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील खतौली येथील उत्कल एक्स्प्रेस अपघातप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडविधानातील 304 अ अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात हलगर्जीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अडचणी वाढल्या असून, विरोधकांनी प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, प्रभूंनी रेल्वे अधिकार्यांना धारेवर धरले असून, अपघाताची जबाबदारी निश्चित करुन दोषी कोण आहे याचा अहवाल संध्याकाळपर्यंत सादर करा, असे आदेश दिले आहेत.
रेल्वे अधिकार्यांना अल्टिमेटम
शनिवारी संध्याकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसला उत्तर प्रदेशमध्ये अपघात झाला. मुजफ्फरनगरच्या खतौली जवळ 14 डबे रुळावरुन घसरून एकमेकांवर धडकल्याने 20 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यावर टीका सुरु झाली आहे. गेल्या 2 वर्षात आठ रेल्वे अपघात झाले असून, यामध्ये 190 हून अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागला. सुरेश प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत असून, या अपघाताची प्रभूंनीही गंभीर दखल घेतली आहे. शनिवारी संध्याकाळीच प्रभूंनी यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले होते. रविवारी सकाळी त्यांनी रेल्वे अधिकार्यांना अल्टिमेटम दिले. रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांना प्रभूंनी अपघाताची जबाबदारी निश्चित करुन दोषींविरोधात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ऑडिओ क्लिपने खळबळ
उत्तर प्रदेशमधील मुजफ्फनगरजवळ झालेला रेल्वे अपघात हा निष्काळजीपणामुळे झाला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या अपघाताबाबत चर्चा करणार्या दोन रेल्वे कर्मचार्यांची ऑडिओ क्लिप समोर आली असून, रेल्वे कर्मचार्यांच्या निष्काळजीमुळे अपघात झाला असल्याचे यात म्हटले आहे. या क्लिपमध्ये गेटमन म्हणतो, रेल्वे येणार आहे आणि लाईन अद्याप जोडण्यात आलेली नाही. म्हणजेच अपघात होणार माहीत असूनही कुठल्याही प्रकारच्या धोक्याची घंटा वाजवण्यात आली नाही. येणार्या ट्रेनला लाल दिवा किंवा झेंडासुद्धा दाखवण्यात आला नाही, हे स्पष्ट होत आहे. या संभाषणात गेटमॅनने असेही म्हटले की ड्युटीवर तैनात गँगमन अपघातानंतर पसार झाले असून, नवीन जेईने आपला फोन बंद केला आहे.