उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचा गौरव

0

जळगाव । राज्यातील उत्कृष्ट कामगीरी करणार्‍या जिल्हा परिषदेला यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत पुरस्कार देवून गौरविण्यात येत असते. जळगाव जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय यशवंत पंचायतराज पुरस्कारात तृतीय क्रमांक पटकविला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि पदाधिकार्‍यांचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. राज्यपाल सी.विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. पुरस्कार स्विकारण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्जवला पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय, आमदार स्मिता वाघ, उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, माजी अध्यक्ष प्रयाग कोळी, माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, संतोष कोळी आदींचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी देण्यात येणार्‍या 17 लाखाचे पारितोषीक मिळाले आहे.

झेडपीचे विशेष कार्य
‘माय झेडपी जळगाव’ अ‍ॅण्ड्राईड अ‍ॅपद्वारे सेवा देणारी जळगाव जिल्हा परिषद राज्यात प्रथम, जिल्ह्यातील एकुण 513 शाळा डिजीटल, 57 शाळा आय.एस.ओ.मानांकन, 283 शाळा अ श्रेणी,1807 शाळा मोबाईल डिजीटल करण्यात आल्या. शिक्षकांसाठी तंत्रस्नेही प्रशिक्षण स्टॉर्म प्रणालीची अंमलबजावणी, विद्यार्थी उपस्थितीत 21 टक्के वाढ, घरकुल योजना शंभर टक्के पुर्ण करणे, जलयुक्त शिवावर योजनेत उल्लेखनीय कामगिरी, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून मोफत वैद्यकिय सेवा आदी विशेष कामगिरी जिल्हा परिषदेने केल्याने गौरव करण्यात आला.

तीन जिल्हा परिषद
उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जिल्हा परिषदेला यशवंत पंचायतराज पुरस्कार देवून गौरव करण्यात येत असतो. यावेळी देखील राज्यातील जिल्हा परिषदेकडुन यासाठी नामांकन मागविण्यात आले होते. प्रत्येक विभागातुन तीन जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले होते. नाशिक विभागातुन जळगाव जिल्हा परिषदेची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली होती. प्रथम पुरस्कार सोलापुर जिल्हा परिषदेला, तर द्वितीय पुरस्कार लातुर जिल्हा परिषदेेने पटकविले आहे. त्यांना अनुक्रमे 50 लाख, 25 लाखाचा पारितोषीक देण्यात आला आहे.

सीईओ बढतीची चर्चा
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांना जळगाव येथे रुजु होऊन तीन वर्ष पुर्ण होत आले आहे. त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांच्या नंतर त्यांची बदली होणार असे बोलले जात होते. पांण्डेय यांना यवतमाळ किंवा बुलठाणा येथे बदली मिळण्याची शक्यता असून ते बुलठाण्यासाठी आग्रही असल्याचे समजते. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी पोलीस उपअधिक्षक मोक्षदा पाटील यांची देखील बदली होण्याची शक्यता आहे. पांण्डेय आणि मोक्षदा पाटील दोन्ही ही मुंबई येथे गेल्याने त्यांच्या बदलीची चर्चा जोरात होती.

अमल चौधरींचा सत्कार
ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणार्‍या उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील कार्यालयीन अधिक्षक अमल चौधरी यांची निवड करण्यात आली होती. चौधरी यांना देखील मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आला. अमल चौधरी हे 2000 या साली प्रशासकीय सेवेत रुजु झाले होते. सामान्य प्रशासन विभाग हे जिल्हा परिषदेतील अतिमहत्त्वाचे विभाग असून त्याठिकाणी ते सेवा बजावत आहे.