‘उत्कृष्ट क्रीडा संघटक’ म्हणून कैलास जैन यांचा सन्मान

0

दोंडाईचा । धुळे जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थीक, पर्यावरण संवर्धन, कला व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे हस्ती बँक व हस्ती स्कूल चेअरमन कैलास जैन यांना महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे व धुळे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 2016 चा ‘जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक’ पुरस्कार प्राप्त झाला. यास्तव महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशनच्या वतीने दि. 20मे रोजी रत्नागिरी येथे असोसिएशनच्या वार्षिक सर्व साधारण सभेत धुळे जिल्हा उत्कृष्ट संघटक सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रसंगी भारतीय तलवारबाजी संघटनेचे सचिव अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश काटुळे, सचिव उदय डोंगरे हे मान्यवर उपस्थित होते.

सदरच्या सर्वसाधारण सभेत कैलास जैन यांच्या वतीने, हस्ती स्कूलचे फेन्सींग कोच विशाल पवार यांनी सन्मान स्विकारला. जैन हे नाशिक विभाग तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. तसेच धुळे जिल्हा बेसबॉल, आर्चरी, चायक्वांदो, स्क्वॅश, रॅकेट बॉल, सर्कल तलवारबाजी, पेटान क्यु, इनडोअर क्रीकेट, रग्बी, सेपक टकरा, सिलंबंब, फिल्ड आर्चरी या विविध खेळांच्या संघटनांचे अध्यक्ष व जिल्हा जम्परोप संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी अशा अनेकविध खेळांच्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या वयोगटातील खेळाडूंसाठी स्पर्धांचे सर्वोत्कृष्ट यशस्वी आयोजन केले आहे. खेळांविषयी मार्गदर्शनाचे व युवकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे कार्य करुन क्रीडा संस्कृती जोपासनेत मोलाचे सहकार्य केले आहे. हस्ती स्कूल येथे 2014-15 मध्ये राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.