जळगाव: आज जागतिक फिजीओथेरेपी दिवस साजरा केला जातो. १२ वर्षापुर्वी जळगावला आलो होतो तेव्हा इथे फक्त दोन ते तीन फिजिओथेरेपी उपचार केंद्र होते.पण आज जळगावात किमान २० ते २५ फिजीओथेरेपी उपचार केंद्र कार्यरत आहे. ही सर्व केंद्र उच्च दर्जाची फिजीओथेरपी सेवा रूग्णांना देत आहे. या केंद्रात असलेले फिजीओथेरेपी डॉक्टर उच्चशिक्षीत आहे. या सर्व बाबींवरून जनसामान्यामध्ये फिजीओथेरेपी बद्दल जागरूकता लक्षात येते.यावरून फक्त एवढेच म्हणता येईल की उत्तम आरोग्यासाठी फिजीओथेरेपी हाच गुरूमंत्र ठरत आहे. आजही जळगावात काही तोतया फिजीओथेरेपीस्ट पण कार्यरत असून रूग्णांच्या जिवाशी खेळ करत आहे. या लेखाव्दारे रूग्णांना आवाहन करण्यात येते की, फक्त उच्चशिक्षीत फिजीओथेरेपीस्टकडेच उपचार घ्यावे. तसेच जळगावातील डॉक्टरांना देखिल या लेखाव्दारे आवाहन करण्यात येते की फिजीओथेरेपीस्ट ही जागा भरतांना अनुभव बघण्याऐवजी योग्य ती पदवी घेतली आहे का? त्याची महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापिठाची पदवी आहे का?,परिषदेचे प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र इ. बाबी तपासून घ्याव्या .
फिजीओथेरेपी फक्त एका आजारांशी संबंधीत नसून सर्व प्रकारच्या आजारावर प्रभावी ठरते.फिजीओथेरेपी उपचार पध्दती ही औषधीविना केली जाते. ज्यामध्ये रूग्णांच्या आजाराचा सखोल अभ्यास करून मगच उपचार केले जातात. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण काही प्रमाणात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, आणि वयाप्रमाणे शरीरात होणारे बदल दैनंदिन जिवनात त्रासदायक ठरू नये यासाठी फिजीओथेरेपी हा एक साधा आणि सोपा पर्याय ठरेल. फिजीओथेरेपीमूळे ही परिस्थीती बर्याच प्रमाणात आटोक्यात येउ शकते.
फिजीओथेरेपीत व्यायाम,इलेक्ट्रोथेरेपी, मॅन्युअल थेरेपी, पिलाटेज, ऐरोबिक व्यायाम स्विस बॉल थेरेपी,अतिदक्षता विभागातील रूग्णांसाठी कार्डीओरेस्पीरेटरी फिजीओथेरेपी, न्युरो फिजीओथेरेपी, अशा विविध थेरेपींचा समावेश असतो. आणि ही थेरेपी आजाराला अनुसरून ठरवण्याचा हक्क फक्त आणि फक्त फिजीओथेरेपीस्टलाच असतो. कारण ते या विषयामध्ये पारंगत असतात.
कंबरदुखी,पाठदुखी,मानदुखी,सायटीका, गुडघेदुखी, स्थुलता, आणि टाचेचे दुखणे, अस्थीरोग शस्त्रक्रियेनंतरचे व्यंग, इतर तसेच न्युरोलॉजीकल,पेडीयाट्रीक, लहान मुलांचे आजार, वृध्द व स्त्रीरोग या मध्ये देखिल फिजीओथेरेपी उपयुक्त असते. कॅन्सर रूग्णांच्या पुर्नवसनासाठी देखिल ही थेरेपी उपयुक्त ठरत आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे स्त्रीयांचा प्रसुतीपुर्व व पश्चात ही थेरेपी प्रभावशाली ठरत आहे. खर तर प्रसुतीनंतर पुर्णपणे आराम सोबत व्यायामही तितकाच महत्वाचा आहे. व्यायामामूळे प्रसुतीनंतर आईच शरीर प्रसुतीच्या पुर्व स्थीतीत येण्यासाठी मदत होते.