उत्तम झुणका भाकर केंद्राच्या फटसह तहसीलमधील टेबल, खुर्च्या जाळल्या

0

भांडणातून मध्यरात्री पेटवून दिल्याचा संशय ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव-शहरातील तहसील परिसरातील उत्तम झुणका भाकर केंद्राच्या फटसह या केंद्राच्या बाजूने असलेल्या तहसील कार्यालयातील वेंडर यांचे फट, टेबल, खुर्च्या जाळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. यात 5 हजार रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजय पवार याने भांडणाच्या रागातून हा प्रकार केल्याचा संशय झुणका भाकर केंद्राच्या मंगला उत्तम चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

काय झाला होता वाद
तहसील कार्यालयाजवळ मंगला उत्तम चौधरी यांचे उत्तम झुणका भाकर केंद्र आहे. याठिकाणी चौधरी ह्या त्यांचा बहिणीचा मुलगा कैलास लक्ष्मण चौधरी यांच्यासह वास्तव्यास आहे. 14 रोजी रात्री 9 वाजता मंगला चौधरी या उत्तम झुणका भास्कर केंद्र बंद करीत असतांना त्यांच्या गल्लीतील विजय पवार हा आला. दारुच्या नशेत त्याने चौधरी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, चौधरी यांनी पवार यास घरी जा, शिवीगाळ करु नको असे सांंगितले. याचा राग आल्याने पवार याने चौधरी यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. बहिणीचा मुलगा कैलास हा कामावरुन घरी आला व त्याने चौधरी यांना पवार याचेपासून सोडविले. पवारने कैलासला सुध्दा शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.

टेबल, खुर्च्या जाळून 5 हजाराचे नुकसान
15 रोजी रात्री 12.40 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातून जात असतांना शिवाजीनगरातील अमोल याने झुणका भास्कर केंद्राच्या फट, तसेच तहसील कार्यालयातील वेंडर लोकांचे टेबल, खुर्च्या जळत असल्याचे बघितले. हा प्रकार मंगला चौधरी यांना कळविला. मंगला चौधरी या कैलाससोबत आले असतांना त्यांना साहित्य जळत असल्याचे दिसून आले. अमोलसह दोघांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही वेळाने आग आटोक्यात आली. या आगीत केंद्राचा फट, वेंडर लोकांचा फट व फटाखालील टेबल, खुर्च्या असे 5 हजाराचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी चौधरी यांनी विजय पवार रा. तहसील कार्यालय याच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.