शहादा । वडिलांच्या उत्तरकार्यात पुरोहितशाहीला नकार देत, कोणत्याही स्वरूपाचे कर्मकांड न करता, वृक्षारोपण करून, महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करीत शहादयातील संतोष माळी या तरुणाने एक आदर्श घालून दिला. उत्तरकार्याच्या वेळी वडिलांच्या स्मृतीला स्मरून स्त्री – पुरुष समानता,शिक्षणाचे महत्व,व्यसनाला नकार, जातीभेद – धर्मभेद व हिंसेला नकार,कर्मकांडांना नकार अशा स्वरूपाचे पाच संकल्पांचे उपस्थित सर्वांनी सामूहिक वाचनही करण्यात आले. असून या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कुटुंबियांना पटवून दिले विचार !
शहरातील विजय नगर येथील रहिवासी संतोष सुखदेव माळी,तुकाराम सुखदेव माळी यांच्या वडिलांचे 12डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यानंतर घरी, कुटुंबात उत्तरकार्यासंबंधी चर्चा सुरू झाली. संतोष माळी यांनी आपल्या कुटुंबियांना व सर्व समाजबांधवांना महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधकी विचारांच्या वारशाची आठवण करून दिली आणि मला कोणत्याही स्वरूपाचे पुरोहिती पारंपारिक कर्मकांड करायचे नाही. त्याऐवजी सत्यशोधकी विचारांच्या परंपरेला पुढे नेणारा विधायक पर्याय द्यायचा असल्याचे सर्वांना पटवून दिले. याला कुटुंबियांसह सर्व नातेवाईकांनी होकार दिला व उत्तकार्रात कर्मकांडाना फाटा देण्रात आला.
क्रांतीकारक निर्णय
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकातील सत्य सर्वांचे आदी घर या अखंडाच्या वाचनाने सुरुवात करण्यात आली. नातेवाईकांनी दिवंगत सुखदेव माळी यांच्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. माळी समाज संघटनेचे राजेंद्र वाघ, सी.डी.बोढरे यांनीही समाजाला मार्गदर्शक अशा या विधायक पर्यायाचे स्वागत केले .महाराष्ट्र अंनिसचे शहादा शाखाध्यक्ष डॉ.बी.डी.पटेल यांनी असा क्रांतिकारी निर्णय घेणारे संतोष महाजन व सर्व कुटुंबियांचे कौतुक केले.संतोष माळी हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शहादा शाखेचे प्रधान सचिव आहेत.
वृक्षारोपण करून सांगता
त्यानंतर प्रबोधन व कर्मकांडांची निरर्थकता स्पष्ट करणार्या काही अखंडाचे वाचन करण्यात आले. शेवटी शेवटी वृक्षारोपण करून या विधीची सांगता करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र अंनिसचे शहादा शाखा अध्यक्ष डॉ.बी.डी. पटेल,उपाध्यक्ष विनायक पवार,माजी जिल्हा उपाध्यक्ष हैदरअली नुरानी, महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे,राष्ट्र सेवा दलाचे मोहन पाटील,ज्येष्ठ नागरिक संघाचे ऑड.गोविंद पाटील,सखाराम सजन पाटील,धोंडू पाटील,डॉ.सखाराम पाटील आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.