मुंबई: उत्तराखंड राज्यातील विष्णू प्रयागला झालेल्या भूस्खलनामुळे चारधाम यात्रेला गेलेल्या महाराष्ट्रातील 179 यात्रेकरु अडकले आहेत. तेथे कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही. उद्या ते सर्व प्रवासी रेल्वेने परतीच्या प्रवासाला लागतील। राज्य सरकार स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून सर्व यात्रेकरु सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
वस्तू व सेवा कर विधेयक ( एसजीएसटी)च्या मंजुरीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड दुर्घटनेचा विषय उपस्थित करीत चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील अनेक प्रवासी तेथील भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत. राज्य सरकारने काय उपययोजना केल्या आहेत, असा सवाल पवार यांनी केला होता.
निवेदन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यात्रेकरुंमध्ये 179 यात्रेकरु महाराष्ट्रातील आहेत. औरंगाबाद-102, पुणे-38, सांगली-33, जळगाव-6 येथाील हे यात्रेकरुं आहेत. सर्व यात्रेकरु सुखरुप आहेत. उत्तराखंड मधील चार्मोली जिल्हाधिकारी यांच्याशी आपल्या अधिका-यांनी संपर्क साधाला होता तेव्हा सदर माहिती मिळाली. भूस्खलनामुळे नादुरस्त रस्ता दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर अडकलेल्या यात्रेकरुंना रेल्वे स्टेशनला आणून त्या ठिकाणाहून रेल्वेने त्यांना महाराष्ट्रात परत आणले असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.