लखनऊ : गेल्या काही महिन्यांपासून समाजवादी पक्षात सुरू असणारा अंतर्गत कलह आज निर्णायक वळणावर आला आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाला वाचविण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव या दोघांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती मुलायमसिंग यादव यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. रामगोपाल यादव यांनी अखिलेश यादव यांना गटबाजी करुन फसवले अशी टीका मुलायम यांनी केली.
याद्यांमुळे उफाळला वाद
समाजवादी पक्षावर वर्चस्वासाठी यादव कुटुंबातच यादवी रंगली आहे. मध्यंतरी ही यादवी थांबवण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामळे काही काळ शांतता होती. मात्र, उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या चारशेवर जागांसाठी मुलायमसिंह यादव यांनी पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्याने ही यादवी पुन्हा उफाळून आली आहे. मुलायम यांच्यापाठोपाठ अखिलेश यांनीही गुरुवारी रात्री 235 उमेदवारांची यादी जाहीर केल्याने पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण आणि कोणाला उमेदवारी मिळणार, असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्तेही अस्वस्थ झाले होते. आज दुपारी अखिलेश यांनी मुलायम यांना पत्र लिहून आपला आक्षेप नोंदविला. यावर मुलायमसिंग यादव यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत त्यांच्यासह रामगोपाल यादव यांना सहा वर्षे निलंबीत करण्याची घोषणा केली.
अखीलेश यांची परीक्षा
रामगोपाल यादव यांनी संकटकालीन राष्ट्रीय प्रतिनिधी सम्मेलन आयोजित केले. यासाठी कमीत कमी 10 ते 15 दिवसांची नोटीस प्रसिद्ध केली जाते. रामगोपाल यादव हे अखिलेशला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात हे अखिलेशला समजले नाही, असेही मुलायमने म्हटलं आहे. पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना बहुमत सिद्ध करावे लागेल किंवा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. दरम्यान, अखिलेश यांच्या हकालपट्टीमुळे समाजवादी पक्षात उभी फूट पडली असून, अखिलेश यांच्या अनेक समर्थकांना पक्षास सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली आहे. तर रामगोपाल यादव यांनी अखिलेश यांची पक्षातून केलेली हकालपट्टी असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातली सपा अखिलेशसोबत
उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी समाजवादी पार्टीत कौटुंबिक यादवी उफाळल्यानंतर महाराष्ट्र समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबरोबर राहील, असे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सांगितले. शुक्रवारी मुलायम सिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश आणि त्यांचे समर्थक रामगोपाल यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. त्यानंतर महाराष्ट्र सपा कोणाच्या बाजून राहील, असे विचारता अबू आझमी यांनी आम्ही अखिलेशच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. अखिलेश यादवना पक्षातून काढण्याची कृती दुःखदायक आहे. अखिलेश चांगले काम करत आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळेच तेथील जनतेने सपाच्या पारड्यात मते टाकली, असेही आझमी म्हणाले.