उत्तरप्रदेशातील अट्टल दरोडेखोर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगावातील 13 घरफोड्यांची कबुली : चोरीच्या चार दुचाकी जप्त : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

जळगाव : उत्तरप्रदेशातील अट्टल घरफोड्याच्या जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने जळगाव शहरातील तब्बल 13 घरफोड्यांची कबुली दिली असून संशयीताच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत तर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. निरज देविप्रसाद शर्मा (फरकाबाद, उत्तरप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव असून आरोपीच्या ताब्यातून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
जळगाव शहरातील वाढत्या घरफोडी आणि दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश दिले होते. घरफोडीसह दुचाकी चोरणार्‍या अट्टल गुन्हेगार हा जळगाव शहरातील शिवकॉलनी परीसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. पथकाने संशयीताला विना क्रमांकाच्या दुचाकीवर पकडल्यानंतर त्याची चौकशी केली असता 2007 मध्ये त्याच्याविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले तर आरोपीने जिल्हापेठ हद्दीत दोन, जळगाव तालुका हद्दीत एक व रामानंद नगर पोलिस ठाणे हद्दीत दहा गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीविरोधात सोमवार, 30 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासत पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून सोन्याचे दागिणे, तीन टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, इन्व्हर्टर, बॅटरी, भांडे आदी मिळून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, वसंत लिंगायत, हवालदार गोरखनाथ बागुल, रवींद्र पाटील, परेश महाजन, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दीपककुमार शिंदे, राजेंद्र पवार, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.