लखनऊ । उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षा परिषदेने त्यांच्याशी संबंधित असणार्या सर्व मदरशांना येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात परिपत्रक जारी केले असून, त्यांच्याशी संबंधित असणार्या सर्व मदरशांना आदेशांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे या प्रक्रियेचे व्हिडीओ शुटींग करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले असून यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
देशभक्तीवर संशय
योगी आदित्यनाथ सरकारच्या या निर्णयामुळे उत्तरप्रदेशात वाद निर्माण झाले आहेत. बहुतेक मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिन होतो, मात्र युपी सरकारने याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा पुरावा मागण्याचे आदेश हे वादग्रस्त मुद्दा बनले आहेत. युपी सरकार मुस्लीमांच्या देशभक्तीवर संशय व्यक्त करत असल्याचा आरोप करुन हा निर्णय पूर्णपणे राजकीय असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
काय आहेत आदेश?
संपूर्ण कार्यक्रमाची छायाचित्रे आणि व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्याही सूचना दिल्या गेल्या आहेत. या व्हिडिओग्राफीचा उपयोग भविष्यात चांगल्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती करण्यासाठी होईल असे पत्रात नमूद आहे. उत्तर प्रदेशात मदरसा परिषदेने 8 हजार मदरशांना मान्यता दिली आहे. 560 मदरशांना अनुदान दिले जाते.
ओवेसींची टीका
‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत आहेच, पण ते गाण्याची सक्ती करणं गैर आहे, राष्ट्रीय गीत सर्वांनीच गायलं पाहिजे, अशी सक्ती करून देशात हिंदुत्ववादाचा प्रसार केला जात आहे; धर्मनिरपेक्षता हद्दपार करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.