उत्तरप्रदेशात काँग्रेसवर अखिलेश यादवांचे दबावतंत्र!

0

लखनऊ । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने 191 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, अखिलेश यादव यांनी एकीकडे काँग्रेससोबत आघाडीसाठी वाटाघाटी सुरू केल्या असतानाच, दुसरीकडे ज्या जागेवर पूर्वी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते त्या जागेवर सपाचे उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. काँग्रेसच्या यादीतदेखील या जागांचा समावेश होता. परंतु, आघाडीची चर्चा पूर्ण करण्याआधीच अखिलेश यांनी यादी जाहीर केली.

पहिल्या यादीत 26.1 टक्के मुस्लीम
उर्वरित जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा पुढील आठवड्यात होणार असल्याचे सपातर्फे सांगण्यात आले आहे. आघाडी झाल्यास सपा 403 पैकी 300 जागा लढणार असल्याचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किरण मोर्य नंदा यांनी सांगितले. सपाचे राज्यसभा खासदार नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितीन यांना हरदोइमधून, तर मुलायमसिंहांचे निकटवर्तीय आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना रामपूरमधील स्वार येथून उमेदवारी देण्यात आली आहे. अखिलेश यांच्या पहिल्या यादीत 26.1 टक्के मुस्लीम उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. एकूण 191 उमेदवारांच्या यादीत 50 मुस्लीम, तर 39 मागासवर्गीय उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसमध्ये नाराजी
समाजवादी पक्षाने विचारात न घेता परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून, आघाडीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मित झाले आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन उमेदवारांची यादी जाहीर करायची होती. पण सपाकडून आधीच उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यातच ज्या मतदार संघांची मागणी काँग्रेसने केली होती, तेथेही सपकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने दोन्ही पक्षांमधील आघाडीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, काँग्रेससाठी 84-89 जागा सोडण्यास अखिलेश तयार झाले असून, त्यामुळे आघाडीचे भवितव्य अधांतरी लटकलेले आहे.