लखनौ | उत्तर प्रदेशात येत्या वर्षभरात ‘गाव तेथे रिपाइंची शाखा’ स्थापन केली जाणार आहे. तसेच वर्षभरात उत्तर प्रदेशात रिपाइंचे 50 लाख सदस्य करण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षसंघटनेची शाखा कार्यरत आहे. संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी येथील रवींद्रालयात आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
भाजप खरा दलितहितैषी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलितहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. मोदी सरकारच्या काळात डॉ. बाबाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्ता कर्तृत्वाच्या गौरवासाठी पंचतीर्थ स्मारक उभारण्याचे तसेच संविधान गौरव दिनसारखे अनेक महत्वपूर्ण कामे होत आहेत. त्यामुळे भाजप दलितहितासाठी झटणारे असून काँग्रेसच दलितविरोधी पक्ष आहे, अशी टीका आठवलेंनी केली.
कॉंग्रेसला बसतोय झटका
मोदी यांनी अनेक चांगले निर्णय घेतल्याने रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने दलित मोठ्या प्रमाणावर भाजपसोबत येत असल्याने काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे हे विरोधी पक्ष भाजपवर नाहकच दलितविरोधी असल्याचा आरोप करीत आहेत, असे आठवलेंनी सांगितले. व्यासपीठावर रिपब्लिकन प्रदेशाध्यक्ष सत्यनारायण, सरचिटणीस मोहनलाल पाटील, राहुलन आंबेडकर, जवाहरलाल अर्जुन कुशवा, अभिनंदन पाठक, आरआर मोरया आदी उपस्थित होते.
उत्तर प्रदेशचे विभाजन करा
उत्तर प्रदेश हे 22 कोटी लोकसंख्या असलेले आणि 80 लोकसभा व 403 विधानसभा सीट असलेले विशाल राज्य आहे. येथील जनतेच्या हितासाठी, तसेच दलित अत्याचार रोखण्यासाठी या राज्याचे विभाजन केले पाहिजे. पूर्वांचल आणि पश्चिमी उत्तर प्रदेश अशा दोन नवीन राज्यांत उत्तर प्रदेशचे विभाजन केल्यास प्रशासन चांगले चालेल. या विभाजनाच्या मागणीसाठी मी प्रधासनमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असेही आठवले यांनी यावेळी जाहीर केले.
दलित भाजपाकडे वळल्याने बसपचा जनाधार घटला आहे. त्यामुळे मायावती आता भाजप सरकारवर टीका करीत आहेत. त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा हे नाटक आहे.
रामदास आठवले