उत्तरप्रदेश खुशहाल! राहुल, अखिलेश आणि मायावती मात्र बेहाल

0

नवी दिल्ली : एक्झीट पोल व मतचाचण्यांचा बोजवारा उडवित मतदाराने राजकीय अभ्यासकांना व राजकीय पंडितांचा धुव्वा उडवला, असेच निकालानंतर म्हणावे लागते आहे. कारण पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे आणि उत्तरप्रदेशात समाजवादी-कॉग्रेस आघाडीचा बोर्‍या वाजला आहे. मागल्या काही दिवसात जिथे राहुल-अखिलेश यांच्या हातमिळवणीचे कौतुक चालले होते तसेच पंजाबमध्ये केजरीवाल यांचे गुणगान माध्यमे करीत होती. पण प्रत्यक्षात पंजाबमध्ये कॉग्रेसने मुसंडी मारली, तर उत्तरप्रदेश व उत्तराखंडात भाजपाने अपुर्व यश संपादन केले आहे.

भाजपावर एक मोठा आक्षेप होता, की देशातील मोठ्या राज्यात चारशेहून अधिक उमेदवारात भाजपाने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. तरीही भाजपानेच सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. पण यालाच मोदींची जादू म्हणायचे, तर पंजाबमध्ये अकाली-भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. तो कॉग्रेसने केला आहे. एकूणच मतदाराने सर्व पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. मोदींची जादू अकालींना वाचवू शकली नाही, तर राहुलची साथ घेऊनही अखिलेशना समाजवदी पक्षाची अब्रु राखता आलेली नाही. उत्तराखंडात राज्यपाल व सभापतींच्या मदतीने वाचवलेली कॉग्रेसी सत्ता, मतदाराने हिसकावून घेतली आहे.

मणिपुर या इशान्येकडील राज्यात भाजपाने मोठी मुसंडी मारताना, पश्चीम दक्षिणेतील इवल्या गोवा राज्यात मात्र भाजपाला आपली सत्ता टिकवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. मनोहर पर्रीकर यांच्या दिल्लीत जाण्याने भाजपाचा गोव्यातील पाया सैल झाला, असेच म्हणावे लागते. मात्र या निकालांनी केजरीवाल यांच्या विनाविलंब देशव्यापी पक्ष होण्याच्या महत्वाकांक्षेला लगाम लावला आहे.