लखनौ- राजकारणात काही रंगांना विशेष महत्त्व आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून रंग बदलण्याची जणू मोहिमच सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा रंग बदलला, काही इमारतींचा, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा आणि खुर्चीचाही रंग बदलला, एसटी बसचा व काही प्राथमिक शाळांचाही रंग बदलला, इतकेच काय तर शौचालयाचाही रंग बदलण्यात आल्याच्या बातम्या आल्या. आता याच पंक्तीत टोलनाक्याचाही समावेष झाला आहे.
Toll plaza on Muzaffarnagar-Saharanpur highway painted saffron in colour pic.twitter.com/9uU4a6M82w
— ANI UP (@ANINewsUP) June 17, 2018
मुजफ्फरनगर सहारनपूर या महामार्गावरील एका टोलनाक्याला भगवा रंग देण्यात आला आहे. संपूर्ण टोलनाका पूर्णतः भगव्या रंगामध्ये रंगवण्यात आला आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. सध्या हा टोल नाका केवळ ट्रायलसाठी सुरू करण्यात आला आहे. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर सामान्य जनतेसाठी हा टोलनाका सुरू केला जाईल. भगवा रंग देणं हे आधीच ठरले होते कारण हा डिझाइनचाच एक भाग होता असं टोलनाक्याच्या व्यवस्थापकांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी आदित्यनाथ यांच्या हरदोई येथील दौऱ्यादरम्यान टॉयलेटच्या टाइल्सलाही भगवा रंग देण्यात आला होता. या प्रकरणावरुन राजकारण तापल्यानंतर टाइल्स हटवण्यात आल्या.