डेहराडून : उत्तराखंडमध्ये गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं विधेयक उत्तराखंडच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक आता केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही गायीचं महत्त्व माहीत आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही गायीला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात आल्याचं उत्तराखंडच्या पशूपालन मंत्री रेखा आर्य यांनी सांगितलं. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देणारं उत्तराखंड हे देशातील पहिलच राज्य ठरलं आहे.
गायीचा अनेकदा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्येही आला आहे. गायीच्या पोटात ३३ कोटी देव वास करत असल्याचं म्हटलं जातं. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा दिल्याने गायींच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलता येतील. शिवाय गोहत्याही थांबतील, असं आर्य म्हणाल्या. दरम्यान, भाजपनं घेतलेल्या या निर्णयावर विरोधी पक्षाने टीका केली असून आम्ही सर्वच जण गायीचा सन्मान करतो. पण गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन भाजपला नेमकं काय सिद्ध करायचं आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. राज्यातील गोशाळांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. भाकड गायींना लोक सोडून देतात, त्यांचा सांभाळ देखील करत नाहीत. राज्यात पशू दवाखान्यांचीही कमतरता आहे, असं विरोधी पक्षनेत्या इंदिरा हृदयेश यांनी सांगितलं.