उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 29 भाविक ठार

0

इंदूर । चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बसला उत्तरकाशीजवळ अपघात झाला. बस अडीचशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 29 भाविकांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचा शोध सुरू करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस, इंडो-तिबेट पोलीस दलाचे जवान शोध मोहीम राबवत आहेत. या अपघातातील सर्व मृत प्रवासी हे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत.

मध्य प्रदेशच्या इंदूरमधील 29 भाविक चारधाम यात्रेसाठी गेले होते. मंगळवारी संध्याकाळी गंगोत्रीवरून दर्शन करून परतत असताना भाविकांच्या बसला अपघात झाला. बस सुमारे अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. अंधारामुळे शोधमोहिमेत अडथळे आले. अपघातग्रस्त बस ज्या भागात अडकली आहे तिथूनच भागीरथी नदी वाहत आहे. त्यामुळे शोध कार्याच्या अडचणीत भर पडली आहे. काही प्रवासी भागीरथी नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवराजसिंग यांच्या विनंतीनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मृतदेह इंदूरपर्यंत नेण्यासाठी ट्रेनमध्ये विशेष बोगी जोडण्याचे आदेश दिले आहेत.