मुंबई । मान्सूनची मध्य भारत आणि पुर्व भारतात बर्यापैकी हजेरी लागली असून 22 जूनला संपुर्ण भारतभर बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आत्तापर्यंत मॉनसूनची प्रगती भारताच्या उत्तरसीमेकडे म्हणजे एनएलएम वलसाड़, नाशिक, बुलढ़ाणा, यवतमाळ, रायपुर, डाल्टनगंज पर्यंत झाली आहे. उत्तर पाकिस्तान आणि जम्मू काश्मिरच्या लगतचा भागात त्याची अनुकूल स्थिती जाणवत आहे. उत्तरप्रदेशच्या पठारी प्रदेशात त्याचा प्रभाव दिसून आल्याचे हवामान खात्याने सांगितले. पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगाना आणि विदर्भातील काही भागात हलका आणि मध्यम पाऊस झाला. तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या किनार्यावर पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली आहे.
पुर्वेकडील राज्यांमध्ये, केरळ आणि कर्नाटकात बरसला पाऊस
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे 21 जूनला बुधवारी मान्सूनने उत्तरेकडे चांगली हजेरी लावली. दिल्ली, उत्तर प्रदेश, एनसीआर मध्ये मान्सूनपुर्व पाऊस पडला. जोरदार पावसाने लखनऊ, वाराणसी, उत्तर प्रदेशातील बराचसा भाग झोडपून काढला. गेल्या 24 तासात ओरीसाच्या काही भागातही जोरदार पाऊस झाला. केरळ आणि कर्नाटकच्या किनार्यालगतच्या भागात चांगलाच पाऊस झाला आहे. याच दरम्यान उप-हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्किम, झारखंड, मध्य प्रदेशचा पुर्वेकडील भाग, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि हिमाचलमधील काही ठिकाणी हलक्या आणि मध्यम सरी कोसळल्या.
येत्या 24 तासात आणखी पावसाची शक्यता
येत्या 24 तासात उत्तर भारताच्या पहाडी आणि मैदानी अशा दोन्ही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम आणि इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. या विभागात एक-दोन ठिकाणीच मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगाना, उप-हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्किम, असाम, मेघालय, त्रिपुरा, ओरीसाचा अंतर्गत भाग आंध्र प्रदेशचा किनारा, कर्नाटकचा किनारा, केरळ आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहाचा काही भाग येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कोंकण-गोवा, झारखंड, गंगीय पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर भारताच्या ुर्वरीत विभागात हलक्या सरी कोसळतील. तर गुजरात, विदर्भ, मराठवाडा, रायलसीमा आणि उत्तर तमिळनाडूच्या काही भागातही पावसाची हजेरी लागेल, असे हवामान खात्याने कळवले आहे.