नवी दिल्ली : किम जोंग उन यांच्या युद्धखोर स्वभावामुळे जगासाठी चिंतेचा विषय ठरलेल्या उत्तर कोरियाने रविवारी हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली. येथील सरकारी प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राद्वारे डागता येईल, असा हायड्रोजन बॉम्ब विकसित केल्याचे यावरून स्पष्ट होते. रविवारी सकाळी उत्तर कोरियात 6.3 रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंप झाला. मात्र, हा भूकंप नसून उत्तर कोरियाने सहाव्यांदा केलेल्या अणुचाचणीचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपासारखे धक्के बसल्यानंतर काहीवेळातच उत्तर कोरियाने अधिकृतरित्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याची माहिती दिली.
जपाननेही दुजोरा दिला
या भूकंपाच्या काही तासांपूर्वीच उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांची हायड्रोजन बॉम्बसोबतचे छायाचित्र शेअर केले होते. या छायाचित्रात काळा पोशाख परिधान केलेले किम जोंग उन हायड्रोजन बॉम्बचे निरीक्षण करताना दिसत आहेत. उत्तर कोरियाने चाचणी केलेला हायड्रोजन बॉम्बमध्ये अणुबॉम्बपेक्षा शंभरपट संहारक क्षमता आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. किम जोंग उन यांनी शास्त्रज्ञांबरोबर अणवस्त्र संस्थेचा दौरा केला आणि त्यांना काही सूचना केल्या. विशेष म्हणजे, हा बॉम्ब क्षेपणास्त्राद्वारे डागता येऊ शकतो. खूप मोठी संहारकशक्ती असलेला हायड्रोजन बॉम्ब उत्तर कोरियाने केलेल्या अथक संशोधन आणि तंत्रज्ञानाचे अविष्कार असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले.
आता अमेरिकेकडे लक्ष
अमेरिकेचा दबाव झुगारून उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला धमकीवजा सूचना दिली होती. त्यामुळे आता अमेरिका काय पावले उचलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उत्तर कोरियाने नव्याने अण्वस्त्र चाचणी केली, तर त्या देशावर कारवाई होऊ शकते असे अमेरिकेने म्हटले होते.