उत्तर कोरियाची चाचणी फसली – द. कोरिया

0

सोल । उत्तर कोरियाची नवीन क्षेपणास्त्र चाचणी फसल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. उत्तर कोरियाने दक्षिण हामक्योंग प्रांतातील सिनपो येथून क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले, पण ते अपयशी ठरले. ते नेमके कुठल्या प्रकारातील होते? हे समजू शकलेले नाही. या चाचणीच्या अपयशाचे विश्‍लेषण करण्यात येत आहे, असे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

उत्तर कोरियाचे संस्थापक किम ईल सुंग यांचचा 105वा जन्मदिवस उत्तर कोरियात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त लष्कराने केलेल्या संचलनात 60 क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्यात काही नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा समावेश होता. उत्तर कोरियाची अण्वस्त्र महत्त्वाकांक्षा मोठी आहे. अमेरिकेने कोरियन द्वीपकल्पाजवळ आपले नौदल आणले आहे. त्यामुळे उत्तर कोरियाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यातूनच उत्तर कोरियाने पुन्हा चाचणी घेतल्याचे सांगितले जाते. उत्तर कोरियाने गेल्या वर्षी दोन अणुचाचण्या घेतल्या असून, उत्तर कोरिया आणखी चाचणी करण्याच्या तयारीत आहे. दोन वर्षांच्या आत उत्तर कोरिया अमेरिकेवर हल्ला करण्याची पूर्ण क्षमता प्राप्त करू शकतो, असा इशाराही गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.