आफ्रिकेत अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांनी जकार्ता (इंडोनेशिया), कैरो (इजिप्त), ऑस्लो (नॉर्वे), रोम (इटली) येथेही राजदूत म्हणून काम केले. इतकेच नव्हे तर 1969 ते 1972 या तीन वर्षांच्या काळात ते भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त होते. तथापि, ते काही विदेश मंत्रालयाच्या सेवेत रुजू झालेले सनदी अधिकारी नव्हते. त्यांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आलेल्या सर्व जबाबदार्या त्यांनी राष्ट्रकर्तव्य म्हणून स्वीकारल्या आणि उत्तम प्रकारे निभावल्या याबद्दल मात्र कुणाचेच दुमत असेल, असे वाटत नाही.
सनदी अधिकार्यांच्या नामावलीत मला सापडलेले पहिले मराठी नाव होते, अशोक भालचंद्र गोखले यांचे! रांची इथे जन्मलेले आणि 1955 साली आयएफएस झालेले गोखले यांनी बॉन (पूर्व जर्मनी), व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), पॅरिस अशा अनेक ठिकाणच्या दूतावासात अधिकारी म्हणून काम केल्यानंतर, 1972 साली ते भूतानमध्ये राजदूत म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर थायलंड आणि इराणमध्येही ते राजदूत होते.
रामचंद्र दत्तात्रय साठे अर्थात राम साठे, हे गोखले यांच्यानंतर विदेश सेवेत रुजू झाले. 1966 च्या डिसेंबरातच त्यांच्यावर हिंदुस्थानचे चीनमधील राजदूत म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. तिथे त्या पदावर दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी फ्रान्स, इराण, जर्मनी अशा विविध देशांत राजदूत म्हणून काम पाहिले.
डॉ. राजेंद्र अभ्यंकर हे तिसरे असे मराठी भाषक राजदूत होते ज्यांनी बेल्जियम, लक्झेनबर्ग, टर्की, सायप्रस या देशात आपल्या विदेश सेवेचा बहुतांश काळ व्यतित केल्यानंतर अमेरिकेतल्या सान फ्रान्सिस्को इथे ते काही वर्षे वाणिज्य दूत अर्थात कॉन्सुल – जनरल म्हणून नियुक्त होते.
1964 साली विदेश – सेवेत प्रवेश केलेले सुधीर देवरे यांनी मॉस्को, वॉशिंग्टन आणि फ्रान्कफुर्ट (जर्मनी) या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी आपल्या दूतावासात कामाचा अनुभव घेतल्यानंतर पुढील अनेक वर्षे ते दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, युक्रेन, आर्मेनिया, जॉर्जिया अशा अनेक देशांत राजदूत होते.
गजानन वाकणकर या नावाचे एक ज्येष्ठ मराठी आयएफएस अधिकारी हे काही वर्षे न्यूयॉर्कमध्ये हिंदुस्थानचे वाणिज्य दूत होते. गिरीश धुमे यांनी दक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात आणि पूर्व युरोपातल्या झेकोस्लोव्हाकिया या देशात राजदूत म्हणून काम पाहिले होते.
राघव बाळ मर्ढेकर हेदेखील नानाविध देशात राजदूत होते. आधुनिक मराठी कवितेचे जनक, कविवर्य बाळ सीताराम अर्थात बा. सी. मर्ढेकर यांचे ते सुपुत्र असावेत, असा माझा तर्क आहे. तो खरा असेल तर, बा. सी. मर्ढेकर यांचे आयसीएस होऊन विदेश सेवेत दाखल व्हायचे अपुरे राहिलेले स्वप्न त्यांच्या या सुपुत्राने पूर्ण केले असेही म्हणता येईल!
लेखक – कवींचे सुपुत्र म्हणून नव्हे, तर स्वतःच लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले ज्ञानेश्वरमुळे यांची विदेश सेवेची प्रदीर्घ कारकीर्द सुरू झाली ती जपान या देशापासून! सीरियासारख्या देशातही ते होते. मालदीवचे राजदूत म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. मॉरिशसमध्ये राजदूत असताना त्यांनी स्थानिक मराठी भाषकांची मने जिंकली होती.
विजय केशव गोखले, जे आज परराष्ट्र व्यवहार खात्यात सचिव आहेत, ते यापूर्वी जर्मनीत राजदूत होते, इंडोनेशियात उच्चायुक्त होते आणि अलीकडच्या काळात चीनमध्ये भारताचे राजदूत होते. विदेश व्यवहार खात्यात ते ज्येष्ठ आणि अनुभवी सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात.या सगळ्या दिग्गजांच्या मांदियाळीत, मला विशेषत्वाने आठवतेय ते नाव आहे स्वर्गस्थ रवींद्र म्हात्रे यांचे! मी स्वतः 1977 साली मुंबईहून रोमकडे मोटारसायकलवरून जात असताना तेहरान या इराणच्या राजधानीत माझा – त्यांचा परिचय झाला होता. तेव्हा ते हिंदुस्थानी वकिलातीत उच्च अधिकारी होते. मला त्यांचा पाहुणचार लाभला होता. तेच रवींद्र म्हात्रे कालांतराने ब्रिटनमध्ये भारताचे उप – उच्चायुक्त असताना काश्मिरी अतिरेक्यांनी बर्मिगहॅम येथून त्यांचे अपहरण करून लगेचच त्यांची नृशंस हत्या केली होती! पुणे शहरातल्या एका पुलाला म्हात्रे यांचे नाव देऊन पुणेकरांनी त्यांच्या स्मृती जागृत ठेवल्या आहेत, याचाही मला इथे उल्लेख करावासा वाटतो. चंद्रपूरचे राजीव शहारे हे परवा परवापर्यंत, युरोप खंडाच्या अगदी उत्तर भागातल्या शीत कटिबंधात, कोपनहेगन येथे डेन्मार्क देशातले भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते तेही अलीकडेच दिल्लीतल्या विदेश मंत्रालयात परतल्याचे समजते. त्यांनी पूर्वी मालदीवमध्येही राजदूत म्हणून काम केले होते.
असे थोडेबहुत मराठी राजदूत अथवा उच्चायुक्त गतकाळात होते. आजमितीस जगभरातल्या सुमारे शंभर देशात आपल्या देशाचे राजदूत, उच्चायुक्त अथवा वाणिज्य दूत नियुक्त आहेत. त्यात मराठी नावे जेमतेम सहा-सात असतील तर ती गोष्ट मराठी मनाला विषण्ण करणारी नक्कीच आहे!
आज डेन्मार्कमधील राजदूतपदाची सूत्रे अजित विनायक गुप्ते या मराठी अधिकार्यांच्या हाती आहेत! 1991 सालचे आयएएफ असलेले गुप्ते यांनी काही वर्षे जर्मनीतल्या आपल्या भारतीय दूतावासात प्रथम सचिव या हुद्द्यावर काम केले. डेन्मार्क येथे राजदूत म्हणून त्यांची झालेली नियुक्ती ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे!
अंकारा, बगदाद, दमास्कस वगैरे ठिकाणच्या वकिलातीत काम केल्यानंतर पापुआ न्यूगिनी, सॉलोमन द्वीपसमूह अशा दक्षिण पूर्व देशात राजदूतपदावर राहिलेले आणि विदेश सेवेचा तीस वर्षांपेक्षा अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नागपूरचे डॉ. अजय गोंदाणे हे आज कॅनबेरा येथे हिंदुस्थानचे ऑस्ट्रेलियातले उच्चायुक्त म्हणून काम पाहत आहेत. समाजशास्त्र या विषयात त्यांनी पी. एचडी. प्राप्त केलेली आहे.
एकेकाळी सांगलीच्या वालचंद महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे अध्यापन करणारे विश्वास सपकाळ हे विदेश सेवेत आल्यानंतर रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग येथे भारताचे वाणिज्यदूत होते. कैरो, शिकागो येथेही भारतीय वकिलातीत होते आणि आता प्रशांत महासागरातल्या फिजी द्वीपसमूहाच्या ‘सुवा’ या राजधानीच्या ठिकाणी ते भारताचे उच्चायुक्त आहेत. फिजी बेटांवर जगातले हजारो पर्यटक येत-जात असतात. विशेष म्हणजे भारतापासून शेकडो मैल दूर असलेल्या त्या इवल्याशा देशाच्या पंधरा लाख लोकसंख्येपैकी पन्नास टक्के लोक ख्रिश्चन धर्मीय तर चाळीस टक्के लोक हे हिंदू धर्मीय आहेत. प्रशांत पिसे हे धुळे जिल्ह्यातले एक शिडशिडीत अंगयष्टी असलेले मराठी अधिकारी सध्या आफ्रिका खंडाच्या अगदी उत्तर टोकावर असलेल्या ट्युनिशिया या देशात भारताचे राजदूत आहेत. नव्व्याण्णव टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या या देशात अरबी भाषाच प्रामुख्याने बोलली जाते. फ्रेंच भाषाही अनेकांना येते. प्रशांत पिसे हे यापूर्वी लीबियामध्ये राहिले असल्याने त्यांना अरबी भाषा समजते आणि मॉरिशसमध्ये राहिले असल्याने फ्रेंच भाषादेखील येते. त्यांच्याबाबत विशेष सांगायचे म्हणजे ते दीर्घ अंतर धावणारे दमदार धावपटू आहेत.
सव्वीस मैल अंतराच्या अनेक मॅरेथॉन स्पर्धामध्ये ते पूर्ण अंतर धावलेले आहेत. लंडनमध्ये उच्चायुक्त कार्यालयात असताना ते लंडन ते ब्रायटन या 48 मैल धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्वित्झर्लंडमधील आल्प्सच्या परिसरात झालेल्या अल्ट्रा मॅरेथॉन माउंट ब्लांक स्पर्धेत तर त्यांनी सुमारे शंभर मैल अंतर धावून पार केले होते, असा मुलखावेगळा छंद जोपासणारे प्रशांत पिसे हे ‘ट्युनिस’ शहरवासीयांच्या कौतुकाचा विषय न झाले तरच नवल म्हणायला हवे!
भूतानमध्ये राजदूत पदाच्या जबाबदार्या पार पाडल्यानंतर, दोन-अडीच वर्षे पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्य केलेले पुण्याचे गौतम बम्बवाले हे गेल्या सहा महिन्यांपासून बीजिंग येथे हिंदुस्थानचे चीनमधील राजदूत म्हणून काम करत आहेत. भारताच्या ईशान्य सीमेवर चीन करीत असलेल्या लष्करी कुरापतींची वेळोवेळी गंभीर दखल घेऊन चिनी सत्ताधार्यांच्या नाकात वेसण घालण्याची अवघड कामगिरी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
याच चीनचा अगदी सख्खा धाकटा भाऊ शोभेल, असा दुसरा देश म्हणजे उत्तर कोरिया! शक्तिशाली अमेरिकेच्या नाकावर टिच्चून या देशाने आपले अण्वस्त्र चाचणी प्रयोग चालू ठेवले हे सार्या जगाने पाहिले. अशा देशात भारताचे राजदूत म्हणून काम करण्यासाठी पुण्याचेच अतुल मल्हारी गोतसुर्वे हे नुकतेच तिकडे रवाना झाले आहेत. गोतसुर्वे हे तसे मूळचे सोलापूर जिल्ह्यातले असले तरी त्यांचे अधिकतर वास्तव्य पुण्यातच झाले आहे. पुण्याच्याच एमआयटीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केल्यावर पुणे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून ते एमटेक झाले. दिल्लीमधल्या राष्ट्रीय जलसंपत्ती आयोगाच्या सेवेत असताना आयएफएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते मेक्सिको या देशात राजदूत होते. त्यांना स्पॅनिश भाषा उत्तम येते. क्युबामध्येही ते होते. गेली काही वर्षे ते पुणे शहरात विभागीय पारपत्र अधिकारी अर्थात रिजनल पासपोर्ट ऑफिसर होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी जनसामान्यांना पारपत्र प्राप्त करणे सुलभ केले. पारपत्रांचे वितरण शीघ्रतेने व्हावे यासाठी पारपत्र वितरण वाहन सुरू केले. गोतसुर्वे हे पुढील काही वर्षांसाठी उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या ‘याँगयांग’ येथे भारताचे राजदूत असणार आहेत. त्यांचे मनापासून अभीष्टचिंतन!
मराठीचा झेंडा सातासमुद्रापार…
आशिया खंडात ईशान्य दिशेला असलेल्या ज्या एका छोट्याशा देशाने, जगातल्या सर्वात शक्तिशाली अमेरिकेची झोप सध्या उडवून टाकली आहे आणि ज्या देशाने आपल्याकडे असलेल्या लांब पल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रांच्या प्रदर्शनाने इतरही अनेक देशांना भयचकित करून टाकलेले आहे, त्या उत्तर कोरिया या देशात, भारताचे राजदूत म्हणून अतुल मल्हारी गोतसुर्वे या अवघ्या 42 वर्षीय पुणेकर मराठी माणसाची नियुक्ती परराष्ट्र व्यवहार खात्याने जाहीर केली. तेव्हा त्या बातमीने मी आनंदित जसा झालो तसा अंतर्मुखदेखील झालो. आजपर्यंत किती मराठी सनदी अधिकारी भारताचे राजदूत अथवा उच्चायुक्त झाले होते आणि आजमितीस किती मराठी सनदी अधिकारी या पदांवर कार्यरत आहेत, याचा मी शोध घेतला. मला असे आढळून आले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या वीस वर्षांच्या कालावधीत तर या पदांवर कुणाही मराठी व्यक्तीची नियुक्ती मुळी झालीच नव्हती!
– प्रवीण कारखानीस
9860649127