लखनऊ । विरोधी पक्षाच्या आमदारांना फोडण्याचा भाजपचा गुजरातमधील पॅटर्न आता उत्तरप्रदेशातही राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आमदार बुक्कल नवाब तसेच सपाचे आणखी एक आमदार यशवंत सिंह आणि बसपाचे जयवीर सिंह यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. हे तीनही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
विधानपरिषदेत बहुमताचा प्रयत्न
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला विधानसभेत प्रचंड बहुमत असले तरी विधानपरिषदेत मात्र समाजवादी आणि बसपाच्या सदस्यांची संख्या जास्त आहे. यामुळे तेथे बहुमत मिळवण्यासाठी भाजपने बिहार व गुजरातच्या नंतर तेथेही फुटीचा पॅटर्न सुरू केला आहे. यातून विधानपरिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. या तीन आमदारांशिवाय भाजपच्या गळाला अजून तीन आमदार लागले असून ते लवकरच राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. हे तिन्ही समाजवादी पक्षाचे असल्याने अखिलेश यादव यांनी या प्रकारावर टीका केली आहे. हे दबावतंत्राचे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेसी आमदार बंगळुरूमध्ये !
तर दुसरीकडे गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांचे राजीनामासत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून अजून अनेकजण या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसच्या 40 आमदारांना बंगळुरू शहरातील एका हॉटेलमध्ये पाठविण्यात आले आहे. तर राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अहमद पटेल यांना हरविण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.