लखनऊ। उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मुलींची छेडछाड रोखण्यासाठी ‘अॅन्टी रोमिओ स्कॉड’ची स्थापना केली. मात्र, असे असतानाही काही टवाळखोर अद्यापही खुलेआम मुलींची छेड काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये भरदिवसा दोन तरुणींचा विनयभंग केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
रामपूरमध्ये एक तरुण आपल्या दोन मैत्रिणींसोबत जात असताना तरुणांच्या एका टोळीने दोन तरुणींना भररस्त्यात गाठले आणि त्यानंतर विनयभंग केला आहे. एका मुलीसोबत त्यांनी अश्लील चाळे केले असून, तिच्यावर जबरदस्तीदेखील केली. इतकेच नाही तर या टोळक्याने या कृत्याचा व्हिडिओही बनवला आणि तो व्हायरल केला.
हा प्रकार 26 मे रोजी घडला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत याप्रकरणी 14 तरुणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. या सर्व प्रकारामुळे उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. तसेच योगी सरकारने सुरू केलेले ‘अॅन्टी रोमिओ स्कॉड’ असतानाही महिलांची भरदिवसा छेडछाड होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.