उत्तर प्रदेशात तयारी ‘मंदिर वही बनाएंगे’ची!

0

लखनौ । उत्तर प्रदेशात मंदिर वही बनाएंगेची तयारी सुरु झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राम मंदिर प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या असून राजस्थानहून तीन ट्रक दगड विहिंपच्या निगराणीखाली अयोध्येत दाखल झाल्या आहेत. राजस्थानहून आलेले हे दगड रामसेवकपूरममधील कार्यशाळेत पोहोचले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून राम मंदिर तयार करण्याच्या प्रयत्नाला गती मिळत आहे.

गुरू पौर्णिमेनंतर आंदोलनाची रुपरेषा
राम मंदिरासाठी आता साधू-संत आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. गुरू पौर्णिमा संपल्यानंतर सीतापूर येथील नारदानंद आश्रमात आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात येणार आहे. नारदानंद आश्रमाचे प्रमुख स्वामी विद्या चैतन्य महाराज यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, की आयोध्यातील भव्य राम मंदिर निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन चर्चा करण्यात येणार आहे.

राम मंदिर प्रकरण न्यायालयात असून, निकाल येण्यापूर्वीच राम मंदिर तयार करण्याची तयारी सुरू आहे. भाजप सरकार सत्तेत असेपर्यंत राम मंदिर बांधून काढावे, अशी अटकळ विहिंपची असून, भापजचे ज्येष्ठ नेते सुब्रम्हण्यम् स्वामी यांनी राम मंदिर प्रकरण निकाली काढण्याची याचिकेद्वारे मागणी केली होती. मात्र, न्यायालयाकडे अनेक कामे असून, वेळ अल्यास प्रकरण निकाली काढू असे सांगून न्यायालयाने याचिका फेटाळली होती.