मुंबई ।उत्तर प्रदेशातील विजय हा स्मशानाचा विजय असल्याची जोरदार टीका करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता तरी रामाचा वनवास संपून अयोध्येत राममंदिर उभे राहिल काय? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. भाजपला थेट अंगावर घेण्याची भूमिका कायम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे राज्यात या पक्षांमधील संबंध चर्चेत आले आहेत.
‘शिवसेना स्टाईल’ समाचार
पाच राज्यांच्या निकालानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला जोरदार टोले मारले आहेत. यात ते म्हणतात की, भाजपने उत्तर प्रदेशातील प्रचारात वचन दिले, शेतकर्यांचे सर्व कर्ज माफ करू!” आता 325चे बहुमत आले आहे. शेतकर्यांना स्मशानात जाण्यापासून त्यांनी रोखले पाहिजे. उत्तर प्रदेशातही कर्ज माफ करा आणि महाराष्ट्रातही करा! उत्तर प्रदेशातील विजय हा ‘नोटाबंदी’च्या निर्णयाचा विजय नसून कर्जमाफीच्या गाजराचा विजय आहे, स्मशानाचा विजय आहे. उत्तर प्रदेशातील तुफानाचे पाणी बाजूच्या उत्तराखंड राज्यात पोहोचले व तेथेही भाजपला बहुमत मिळाले. पण पंजाबात काँग्रेसचे राज्य पूर्ण बहुमताने आले आहे. भाजप, अकाली दलाची तेथे धुळधाण झाली. गोव्यात भाजपला पंधरा जागांचाही आकडा पार करता आला नाही. म्हणजे मोदी यांना उत्तर प्रदेशात स्वीकारले व उरलेल्या तीन राज्यांनी नाकारले, असा टोलाही त्यांनी मारला आहे. या प्रचंड विजयानंतर तरी रामाचा वनवास संपून अयोध्येत राममंदिर उभे राहील काय ? असा खोचक सवालदेखील उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.