लखनऊ । मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला आहे. राष्ट्रगीत संपताच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल राम नाईक यांच्यावर कागदाचे गोळे फेकले. प्रचंड गदारोळातही राज्यपालांनी आपले अभिभाषण थांबवले नाही. यावेळी राज्यपालांचे कागदी गोळ्यांपासून रक्षण करण्यासाठी तेथील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी फाईली हातात घेत त्यांचा बॅट म्हणून वापर केला.
संपूर्ण राज्य पाहात आहे- राज्यपाल
विरोधी पक्ष जे काही करत आहेत ते योग्य नाही, संपूर्ण उत्तर प्रदेश तुम्हाला पाहतो आहे,’ असे नाईक यांनी घोषणाबाजी करणार्या आमदारांना सुनावले. मात्र, तरीही विरोधकांचा गोंधळ सुरुच होता. आमदारांनी अशा प्रकारचे वर्तन करणे योग्य नाही. उत्तर प्रदेश विधानसभेचे 17 वे अधिवेशन 22 मे पर्यंत चालणार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना विरोधकांनी यावेळी हा प्रकार केला आहे.
जातीय दंगलींच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरले
बुलंदशहर, सहारणपूर, गोंडामध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरत विरोधकांनी गदारोळ घातला. ‘पोलीस पीट रही है थानों में, योगी तेरे जमाने में’, ‘गोरक्षा के नाम पर गुंडाई बंद करो,’ असा मजकूर असलेले फलक विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेत दाखवले. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष विरोध दर्शवत असताना ‘कानून व्यवस्था ध्वस्त है, सरकार बुचडखाने, तीन तलाक में व्यस्त है,’ अशा घोषणा देत काँग्रेसच्या आमदारांनीदेखील सरकारचा विरोध केला.
राज्यपालांच्या भाषणात अनेकदा अडथळे
समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी राज्यपाल राम नाईक यांच्या आसनाजवळ जाऊन कागद भिरकावले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी नाईक यांना सुरक्षा पुरवली. सभापतींनी शांत राहण्याचे आवाहन करुनही विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यपालांच्या भाषणात अनेकदा अडथळे आणले.