उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके चौकशीसाठी एनआयएला पाचारण

0

लखनौ – अर्थ संकल्पीय अधिवेशन काळात उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके सापडली असून दहशतवाद विरोधी सुरक्षा व्यवस्थेमधील त्रुटी त्यामुळे उघड झाल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्फोटके सापडल्याची माहिती देत या घटनेचा निषेध करण्याचे आवाहन सभागृहाला केले. सर्वोच्च मानली जाणारी वैधानिक यंत्रणाच स्फोटकांनी उडवून देण्याची दहशतवाद्यांची तयारी पाहून नागरिक आणि नेतेही चक्रावले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यात शीघ्र कृती दल तैनात नसल्याकडे लक्ष वेधून राष्ट्रीय तपास यंत्रणेला पाचारण केले आहे. देशातील सर्वात मोठी विधानसभा दहशतवाद्यांच्या रडावर आल्याने आदित्यनाथ यांनी चिंता व्यक्त केली आहे.

कुठे, कशी सापडली स्फोटके…
साफसफाई करत असताना सदनमध्ये सफाई कर्मचार्‍यांना पीईटीएन सापडले. त्या वेळी उत्तर प्रदेश विधानसभेचे कामकाज सुरू होते. समाजवादी पक्षाच्या आमदाराच्या आसनाखाली एका पाकिटामध्ये एका प्लास्टीक बॅगेत ती ठेवली होती. पेंटाएरिथ्रिटॉल टेट्रानाईट्रेट (पीईटीएन) असे स्फोटकाचे रासायनिक नाव आहे. अवघे 500 ग्रॅम पीईटीएन स्फोटकने पूर्ण विधानसभा भवन उडवले जाऊ शकते. इतके ते ज्वालाग्रही आहे.

योगी म्हणतात….
स्फोटके सापडली तेव्हा सभागृहात हजर होते. त्या सर्वांची चौकशी करा. या घटनेची चौकशी एनआयए मार्फत व्हावी. आता शीघ्र कृती दले बोलवून स्थायी स्वरूपात ती तैनात केली पाहिजेत. सद्य स्थितीतील सुरक्षा यंत्रणांचा बेजबाबदारपणा कारणीभूत. लोकप्रतिनिधींना विधानसभेत मोबाईल बंदी करण्यात येईल.

पीईटीएनची वैशिष्ट्ये ……
1. सर्वाधिक स्फोटक आणि शोधण्यास महाकठिण. प्लास्टीकसारखे असल्याने मेटल डिटेक्टरनाही आढळून येत नाही. पीईटीएनच्या रेणूची रचना श्वानांनाही चकवते.
2. अधातू असल्याने एक्सरे मशिन्सही पीईटीनला शोधू शकत नाहीत. केवळ १०० ग्रॅम पीईटीएन एक कार पूर्णपणे जाळू शकते
3. उष्णतेने किंवा तरंगाद्वारेही स्फोट घडवता येतात

केव्हा वापर झाला पीईटीएनचा…..
1. 2009 – नॉर्थवेस्ट एअरलाईनमधील पॅसेंजरच्या अंडरवेअरच्या शिलाईत सापडले.
2. 2010 – ऑक्टोबरमध्ये येमेन ते अमेरिका मालवाहू विमानात स्फोटासाठी वापर.
3. 2011 – सप्टेंबरमध्ये दिल्ली हायकोर्टातील स्फोट; २२ डिसेंबर रोजी शू बॉम्बर म्हणून ओळखला जाणाऱ्या रिचर्ड रिडे याने अमेरिकन एअरलाईन्स उडवून देण्यासाठी वापरले.

स्फोटक तेही विधानसभेत…
पीईटीएन गंधहीन स्फोटक असल्याने प्रशिक्षित कुत्र्यांनाही सापडत नाहीत. मेटल डिटेक्टरही या स्फोटकांना पकडू शकत नाही. कमी प्रमाणातील पीईटीएनचा स्फोट मात्र अत्यंत मोठा होतो. लष्कर आणि खाण उद्योगासाठी या स्फोटकांचा वापर केला जातो. तेही विशिष्ट परिस्थितीतच याचा वापर होतो. अशा एकंदतरीत स्थितीत सुरक्षा कवच भेदून स्फोटक पदार्थ विधानसभेच्या आतमध्ये कसे आले, असा सवाल उपस्थित होतो.