पिंपरी (प्रतिनिधी) – उत्तर भारतातील अनेक नागरीक पुणे, पिंपरी- चिंचवड शहरामध्ये कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या आणि शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. त्यांना पुणे येथून उत्तर भारतात जाण्या-येण्यासाठी आठवड्यातील काही दिवसच ठरवाकी रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. उत्तर भारतामध्ये जाण्या-येण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या फेर्या वाढविण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले आहे. उत्तर भारतीय प्रवाशी संघटनेच्यावतीने रेल्वेच्या अधिकच्या फेर्या वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्या अनुशंगाने खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रिय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेवून उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी केली आहे. यावेळी उत्तर भारतीय रेल्वे प्रवासी संघटनाचे गुलाब तिवारी, रामचंद्र ठाकूर, राजेंद्र पांडे, सुभाष सिंग उपस्थित होते.
* आयोध्या येथे जायला रेल्वेगाडी हवी
पुणे येथून सुटणारी गाडी क्र. 22131 ज्ञानगंगा एक्सप्रेस (फक्त सोमवारी) आणि गाडी क्र. 22132 ज्ञानगंगा एक्सप्रेस मांडवाडी (फक्त बुधवारी) सुटते. गाडी क्र. 15030 पुणे-गोरखपुर एक्सप्रेस ही पुणे येथुन (फक्त शनिवारी) आणि गाडी क्र. 15029 गोरखपुर-पुणे एक्सप्रेस ( फक्त गुरूवारी ) गोरखपुर येथुन सुटते. या गाड्या आठवड्यातुन काही दिवसच सुटत असल्याने नागरिकांचे अडचण होत आहे. त्यामुळे या रेल्वे गाड्या दररोज वरील रेल्वे स्टेशन वरून सोडण्यात याव्यात. पुणे येथून आयोध्या येथे जाण्यासाठी रेल्वेची थेट सोय नसल्याने पुणे येथुन आयोध्या येथे जाण्यासाठी रेल्वेगाडी सोडण्यात यावी अशी मागणी देखील बारणे यांनी केली आहे.