मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री पदांकडे एक नजर टाकल्यास महाराष्ट्रातील सर्वच प्रादेशिक विभागांना संधी मिळाली आहे, अपवाद आहे फक्त खान्देश अर्थात उत्तर महाराष्ट्राचा….! उत्तर महाराष्ट्रात ‘त्या’ ताकदीचे नेते होवून गेले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी शिक्षणमंत्री व विधानसभेचे माजी सभापती स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी, माजी मंत्री के. एम. बापू पाटील, रोहिदास दाजी पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या सारखी अनेक नावे आहेत. मात्र त्यांना मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री पदांनी हुलकावणी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या इतिहासावर एक नजर टाकल्यास कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 18 नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. प्रत्येक विभागाला किमान दोन वेळा संधी मिळाली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्राला अद्यापही संधी मिळालेली नाही. अनेकवेळा जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नेते त्या पदापर्यंत पोहोचले परंतु या भागाचे स्वप्न पूर्ण होवू शकलेले नाही. या भागातील अनेक नेते राजकिय दृष्टीने दिग्गज व ताकदवर होते. त्यापैकी काही महनीय व्यक्तिविषयी आपण चर्चा करू या…
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
सत्तरच्या दशकात विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेल्या मुळच्या बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील प्रतिभाताई देविसिंह पाटील यांनी विविध खात्याच्या मंत्रीपदासह राज्यसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली होती. वकृत्व शैली दिल्लीतील पक्षनेतृत्व स्व. इंदिरा गांधी यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध असल्याने त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळालेे. 1970 च्या जातीय दंगलीची पाहणी करण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी जळगावात आल्या होत्या. त्यावेळी ‘जलगाव आयी हूँ, प्रतिभा के घर जाऊंगी नही क्या?’ असे म्हणून प्रतिभाताईंच्या घरी इंदिरा गांधी गेल्याचा इतिहास आजही जुने जाणते सांगतात. काँग्रेसची निर्विवाद सत्ता असतांना प्रतिभाताईंना मुख्यमंत्रीपदाची हुलकावणी दिली. यानंतर काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी, त्यांना राजस्थानचे राज्यपाल त्यानंतर थेट राष्ट्रपतीपदाची संधी दिली. मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठे पद प्रतिभाताईंना मिळाले पण ‘मुख्यमंत्री’ पदाची संधी हुकली.
स्व. मधुकरराव चौधरी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अंगा-खांद्यावर खेळलेल्या स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचा गांधी घराण्याशी अतिशय निकटचा संबंध होता. त्यांचे वडील स्व. धनाजीनाना चौधरी यांच्यामुळेच 1936 चे काँग्रेस चे पहिले ग्रामिण अधिवेशन फैजपूर येथे झाले होते. त्यामुळे ‘बाळासाहेब’ टोपण नाव असलेले मधुकरराव चौधरी यांचा राज्याच्या राजकारणात दबदबा होता. अनेकवर्ष शिक्षणमंत्री राहिलेल्या मधुकरराव यांनी शिक्षणाची ‘श्वेतपत्रिका’ काढण्याने शिक्षणक्षेत्रात आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सन 1982 मध्ये ए. आर. अंतुले यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर निष्ठावान मधुकरराव चौधरी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होते. मात्र जातीय समीकरण राखण्यासाठी त्यांनी ‘त्याग’ केल्याचा इतिहास आहे. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ‘दिल्ली’एकनिष्ठ असल्यामुळे त्यांना संधी आली पण विधानसभेच्या सभापती पदावर त्यांना समाधान मानावे लागले.
सुरेशदादा जैन
‘जनतेच्या भल्यासाठी शंभर वेळा पक्ष बदलविल’ अशी जाहीर घोषणा करणारे स्पष्टवक्ते व जळगाव नगरीचे शिल्पकार सुरेशदादा जैन यांचा राजकिय प्रवास समाजवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व पुन्हा शिवसेना असा आहे. शिवसेनेमध्ये गेल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे गृहनिर्माण मंत्री पद दिले गेले होते. जळगाव महानगरातील झोपडपट्टी निर्मुलन प्रमाणे मुंबईतही त्यांनी योजना आखली होती. ही योजना यशस्वी झाली तर जैन यांचे पारडे जड होईल, आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना मुख्यमंत्री करतील अशी भिती इतरांना होती. त्यामुळे या योजनेत खोडा घातला गेला. त्यानंतर जैन यांचा शिवसेनेतीलच मंत्र्यांशी खटका देखील उडाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी व पुन्हा शिवसेनेत गेल्यानंतर सन 2009 साली राजकीय तडजोडीची जबाबदारी जैन यांच्यावर देण्यात आली होती. तेव्हाही त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती. मात्र आघाडीचे सरकार आले आणि आणखी एक संधी गेली.
रोहिदास दाजी पाटील
धुळे जिल्ह्यातील मोठे व वजनदार नेते, अनेक खात्यांचे मंत्रीपद उपभोगलेले रोहिदास दाजी पाटील यांच्या परिवाराचा गांधी घराण्याशी अतिशय निकटचा संबंध मानला जातो. त्यामुळे नव्वदच्या दशकात व काँग्रेस मधून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते. अनेक वर्ष अनेक खाते मिळणार असतांनाही मंत्रीपद न घेता ’दाजी’ दिल्लीच्या निरोपाची वाटप पाहात होते. मात्र दिवसेंदिवस महाराष्ट्रातील राजकिय उलथापालथामुळे त्यांची आणि उत्तर महाराष्ट्राची संधी हुकली.
एकनाथराव खडसे
जळगाव जिल्हा एकेकाळी काँग्रेस चा बालेकिल्ला होता. पक्षनिष्ठा, ध्येय व राजकिय ताकदीच्या जोरावर एकनाथराव खडसे अर्थात नाथाभाऊ यांनी जळगाव जिल्ह्याला भाजपामय केले. उत्तर महाराष्ट्रातही भाजपाची परिस्थिती सुधारली. खंबीर नेतृत्व आणि स्पष्टवक्तेपणासाठी नाथाभाऊ प्रसिध्द आहेत. अनेक विषयांचा अभ्यास, खडा-न-खडा माहिती, त्यांच्या समोर ‘कलेक्टर’ लेव्हलच्या अधिकार्यांना अनेकवेळा घामोघाम झालेले मी अनेकवेळा पाहिलेले आहे. गेल्या 35-40 वर्षापासून भाजपाशी एकनिष्ठ असलेले नाथाभाऊ यांना मुख्यमंत्रीपदाची संधी होती. ओबीसी नेते असल्यामुळे राजकीय समीकरण योग्य होते. किंबहुना अभ्यासू, पक्षनिष्ठा व ज्येष्ठता या सर्वच बाबींनी ते सरस असल्यामुळे त्यांचा दावा प्रबळ होता. राज्यात गेल्या अनेक वर्षापासून असलेली भाजपा – शिवसेनेची युती तोडून स्वतंत्र निवडणूका लढविण्याचा धाडसी निर्णय आ. खडसे यांनी घेतला. परिणामी राज्यात भाजपाच्या जागा वाढल्या. सत्ता आली व मुख्यमंत्रीपद भाजपाच्या पारड्यात पडले. पंचायत समिती सदस्यापासून सुरू झालेला राजकिय प्रवास, आमदार, भाजपा गटनेते, पाटबंधारे मंत्री (1995- 99) व विरोधी पक्षनेते पदापर्यंत गेला.
सत्ता आल्यानंतर प्रबळ दावेदार असतांनाही भाजपातील राजकिय परिस्थितीमुळे नाथाभाऊंना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. अभ्यासू, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असल्यामुळे महसूल, कृषीसह 11 खात्यांचे मंत्रीपद त्यांच्याकडे आले. परंतु आतापर्यंतच्या उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्रीपदाच्या सर्वात जवळ जावूनही नाथाभाऊंना मंत्रीपदावर समाधान मानावे लागले, ही बाब त्यांचे मित्र, परिवार, कार्यकर्त्यासह विरोधकांनाही अस्वस्थ करणारी आहे.
मुख्यमंत्रीपदा ऐवजी अनेकवेळा महत्वाची खाती, महामंडळ, प्रदेशाध्यक्ष वगैरे पदे देवून उत्तर महाराष्ट्र व खान्देशच्या नेत्यांना ’खुश’ करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झालेला आहे. खान्देशात अनेक मंडळी मातब्बर होते व आहेत. मात्र मंत्रीपदावरच त्यांना समाधान मानावे लागल्याचा इतिहास आहे . अलिकडे गिरीश महाजन कॅबिनेट मंत्री असुन मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू आहेत. शिवाय संघाला चालनारे व ओबीसी नेते आहेत. मुख्यमंत्री पदाचा फेरबदल झाल्यास उजव्या-डाव्यांकडे लवकर लक्ष जाते, असे म्हणतात…… अंदाज, विश्लेषण व भाकीत किती ही केले, तरी ‘जो जिता वोही सिकंदर’ या प्रमाणे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला तोच राजा, बाकी…………
एकंदरीत, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा उत्तर महाराष्ट्राचा व खान्देशचा अनुशेष कधी भरून निघेल, याकडे सर्वांचे डोळे लागले असून आज ना उद्या संधी मिळेल अशा आशेने समाधान मानावे लागत आहे.
मनोज बारी
आवृत्ती संपादक,
देशोन्नती, जळगाव
– मो.बा. 9822593938